अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 : आण्णा हजारे, पोपटराव, विखे, थोरात, रोहित पवार, राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पण, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप नेते राम शिंदे, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.(Prestige election for many veterans in Ahmednagar district)
राळेगणसिद्धी, हिवरेबाजारमध्ये 30 वर्षांनी निवडणूक
आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली आहे. अण्णा आणि पवारांना बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यात अपयश आल्याने या दोघांच्याही वर्चस्वासाठी यंदा मोठा धक्का बसलाय.
हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यामुळे 7 सदस्यीय ग्रामपंचायत 1989 पासून बिनविरोध राहिली. पण यंदा ही परंपरा खंडीत झाली असूनस सातही जागांसाठी निवडणूक झाली. दुसरीकडे राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आमदार निलेश लंके यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यांच्या या मोहिमेला यशही आले होते. गावकऱ्यांची बैठक घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी माशी शिंकली असून अण्णा आणि लंके यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.
रोहित पवार, राम शिंदेंमध्ये वर्चस्वाची लढाई
कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांचा पराभव करुन त्यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करण्यसाठी राम शिंदे प्रयत्नशिल आहेत. त्यामुळे रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.
विखे-पाटील आणि थोरातांमध्ये 12 गावात संघर्ष
राधाकृष्ट विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात संगमनेरमधील 14 ग्रामपंचायतींमध्ये सघर्ष पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील 14 गावं विखे पाटलांच्या शि्रडी मतदारसंघात येत असल्यानं या ग्रामपंचायतींमध्ये विखे समर्थक आणि थोरात समर्थकांमध्ये ग्रामपंचायतीचा आखाडा रंगला होता.
विखे-थोरात आमनेसामने लढत
चिंचपुर बुद्रुक, खळी, दाढ खुर्द, ओझर खुर्द, कनोली, चनेगाव, झरेकाठी, शेडगाव, प्रतापपूर, मनोली, प्रिंपीलौकी, आजमपुर, औरंगपुर, शिबलापुर, या 14 गावांमध्ये थेट विखे-थोरात लढत झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी आज कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :
Prestige election for many veterans in Ahmednagar district