Maharashtra Lockdown : ‘विधानसभेचं विशेष सत्र बोलवा आणि कोरोनाची स्थिती स्पष्ट करा’, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
कोरोनामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट बनली आहे. विधानसभेच्या विशेष सत्रात कोरोनाची परिस्थिती सरकारने स्पष्ट करावी, असं ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केलंय.
पुणे : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येसह मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लस, ऑक्सिजनचा तुटवडा आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचं विशेष सत्र बोलवण्याची मागणी केली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट बनली आहे. विधानसभेच्या विशेष सत्रात कोरोनाची परिस्थिती सरकारने स्पष्ट करावी, असं ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केलंय. (BJP state president Chandrakant Patil’s reply to Shiv Sena MP Sanjay Raut)
‘संजय राऊतांनी राज्य सरकारला सल्ला द्यावा’
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात आहे. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
‘संजय राऊत यांनी कोरोनाच्या साथीबद्दल बोलताना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असे ट्वीट आज सकाळी केलं आहे. ही अभूतपूर्व स्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळीकडे नुसता गोंधळ आणि तणाव आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे अचूक आहे. पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे. संपूर्ण देशात अशी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती तर तसे करणे योग्य झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल’ असंही पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. यावेळी सरकारने सर्व पारदर्शक परिस्थिती जनतेसमोर मांडावी, यासाठी तातडीने विधानसभा सत्राचे आयोजन करून सर्व आमदारांच्या समोर राज्यसरकारने सत्य परिस्थिती मांडावी, अशी मी मागणी करतो. pic.twitter.com/TYlf6SUC10
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 19, 2021
संजय राऊत हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आणि या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला या प्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा, असा खोचक सल्लाही पाटलांनी राऊतांना दिला आहे.
तातडीने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा: संजय राऊत
कोरोनामुळे देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी केलीय. राऊत यांनी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. बेडस् नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसही उपलब्ध नाही. हे दुसरे तिसरे काही नसून संपूर्णपणे गोंधळ माजल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करावे. या अधिवेशनात कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या सद्यपरिस्थितीवर चर्चा व्हावी, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
It’s an unprecedented & almost a war like situation. Utmost confusion & tension everywhere!
No beds,no oxygen & no vaccination as well ! It’s nothing but TOTAL CHAOS !
A Spl session of the Parliament for atleast 2 days should be called to discuss the situation! जय हिंद! pic.twitter.com/c5rWbhyTD0
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 19, 2021
संबंधित बातम्या :
‘म्हणे फडणवीसांना अटक करा, अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?’ चित्रा वाघ यांनी उडवली चाकणकरांची खिल्ली
केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात भातखळकरांची पोलिसांत तक्रार
BJP state president Chandrakant Patil’s reply to Shiv Sena MP Sanjay Raut