MLC Election Congress Candidate : विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी जाहीर
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसकडूनही दोन उमेदवार जाहीर केले आहेत. आता काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली आहे.
मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी सुरु आहेत. त्याचवेळी विधान परिषद निवडणुकीसाठीही प्रमुख पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. शिवसेना, भाजपनंतर आता काँग्रेसकडूनही दोन उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) आणि काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं संधी दिली आहे. भाजपकडून पाच उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यातील चार अर्ज आज दाखल करण्यात आले. तर शिवसेनेच्या दोन उमेदवारांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अशावेळी काँग्रेसकडून कुणाला संधी दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता काँग्रेसनं एक प्रसिद्धी पत्रक काढून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी दिल्याचं जाहीर केलंय.
भाजपकडून चार उमेदवारी अर्ज दाखल
भाजपकडून विधान परिषदेसाठी विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील दरेकर, लाड, भारतीय आणि शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला आहे. तर उमा खापरे यांचा अर्ज उद्या सकाळी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवसेनेकडून दोन नवे चेहरे
शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलेले आणि आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विजयात मोठा वाटा असलेले सचिन अहिर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलीय. तर आदिवासी नेते आमशा पाडवी यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. या दोघांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
निवडणुकीचा कार्यक्रम काय?
>> 9 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार >> 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईलय >> 13 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. >> 20 जून रोजी मतदान पार पडेल. >> सकाळी 9 ते दुपारी 4वाजेपर्यंत मतदान होईल. >> 20जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल. >> 20 जून रोजीच विधान परिषदेचं चित्र स्पष्ट होईल.