Maharashtra MLC Election : सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे, तरीही बिनविरोध नाहीच ! 10 जागांसाठी 11 उमेदवार
आता भाजप समर्थक सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
मुंबई : राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीची (Legislative Council Election) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भाजपकडून एकूण सहा उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. मात्र, आता भाजप समर्थक सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनीही आपला डमी अर्ज मागे घेतला आहे. तर काँग्रेसही आपला दुसरा उमेदवार मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसनं दुसरा उमेदवार मागे घेतला नाही. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीला झटका दिल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून 6 उमेदवार देण्यात आले होते. त्यातील सदाभाऊ खोत यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून डमी उमेदवार असलेले शिवाजीराव गर्जे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
काँग्रेसचे दोन उमेदवार
विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची आवश्यकता आहे. अशावेळी काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून येणं कठीण आहे. अशास्थितीतही काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवार कायम ठेवल्याची माहिती मिळतेय. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उर्वरित मतं आणि अपक्षांच्या साथीने दुसरा उमेदवार निवडून येईल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे.
10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी `11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे 5 आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजप उमेदवार
>> प्रवीण दरेकर >> राम शिंदे >> उमा खापरे >> श्रीकांत भारतीय >> प्रसाद लाड
काँग्रेस उमेदवार
>> भाई जगताप >> चंद्रकांत हंडोरे
शिवसेना उमेदवार
>> सचिन अहिर >> आमशा पाडवी
राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार
>> रामराजे निंबाळकर >> एकनाथ खडसे