महाराष्ट्राचा नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? तीन माजी मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्र प्रभारींचं मंथन
महाराष्ट्राच्या नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्तीवर आज (मंगळवार) महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांयकाळी 6:30 वाजता मुंबईत बैठक होणार आहे.
![महाराष्ट्राचा नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? तीन माजी मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्र प्रभारींचं मंथन महाराष्ट्राचा नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? तीन माजी मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्र प्रभारींचं मंथन](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/01/05211952/Ashok-Chavan-prithviraj-Chavan-And-SushilKumar-Shinde.jpg?w=1280)
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाचे वारे वाहत आहेत. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नव्या नेतृत्वाकडे देण्याचा प्लॅन काँग्रेसने आखलेला आहे. आज मुंबईत महाराष्ट्राच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्र प्रभारींचं मंथन होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? याचं उत्तर आज संध्याकाळी कदाचित मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra New Congress President, Today Important meeting in Mumbai)
महाराष्ट्राच्या नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्तीवर आज (मंगळवार) महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांयकाळी 6:30 वाजता मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहे.
मंत्रीपदासह आपल्यावर 3 महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आपणच पक्षश्रेष्ठींशी बोलून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. तसंच तरुण नेत्याला संधी द्या, आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असंही पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचं थोरात म्हणाले. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणता चेहरा असेल हे आपण सांगू शकत नसल्याचंही थोरातांनी म्हटलंय.
एच. के. पाटील यांच्याबाबत नाराजी नाही- बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यावर बाळासाहेब थोरात नाराज आहेत. त्या नाराजीतूनच बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याबाबत बोलताना एच. के. पाटील यांच्याविरोधात कुठलीही नाराजी नाही. तसंच आपल्यावर कुणी नाराज होण्याचंही काहीच कारण नसल्याचं थोरात यांनी म्हटलंय.
प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाच्या हालचाली
बाळासाहेब थोरात 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते राजीव सातव यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपद असल्याने त्यांना पक्षासाठी हवा तसा वेळ देणं जमत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात येणार असून राज्याला नवा प्रदेशाध्यक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी थोरात यांच्याशी चर्चा करण्याकरिता त्यांना दिल्लीत बोलावलं गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.
प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणत्या नावांची चर्चा?
सध्या तरी काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या राज्यातील नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्याशिवाय नाना पटोले, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांची नावेही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
(Maharashtra New Congress President, Today Important meeting in Mumbai)
हे ही वाचा
तरुण नेत्याला संधी द्या, पाठीशी उभे राहू, राजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरात म्हणतात…
बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार?; दिल्लीत सातव यांच्याशी खलबतं
सातव, केदार, वडेट्टीवार, ठाकूर, पटोले की चव्हाण?; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच