Sanjay Raut : शिवसेना बॅकफुटवर? महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, 24 तासाच्या आत मुंबईत या, संजय राऊतांचं शिंदे गटाला आवाहन
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी पहिल्यांदाच शिवसेनेच्या वतीनं दाखवण्यात आली आहे.
मुंबईः गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटानं ताणून धरलेल्या विषयात आता शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतंय. अनैसर्गिक आघाडी नको, असा आग्रह धरणाऱ्या एकनाथ शिंदेंचं म्हणणं शिवसेना मान्य करायला तयार आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेरही पडण्याची आमची तयारी आहे. फक्त आमदारांनी मुंबईत यावं आणि इथे येऊन चर्चा करावी. पुढील 24 तासात आमदारांनी मुंबईत यावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना पक्ष आणि राज्यातली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेनं खरंच हे पाऊल उचललं तर पक्ष पातळीवर ती एक मोठी तडजोड म्हणावी लागेल. सूरतच्या मार्गावरून परतलेले आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्या सत्कार समारंभावेळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटाला हे आवाहन केलं.
काय म्हणाले संजय राऊत?
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना आवाहन केलं. ते म्हणाले, ‘ आमदारांनी आधी महाराष्ट्रात यावं. मुंबईत यावं. अधिकृतपणे मागणी करावी. त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. पण आमदारांनी आधी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. तिथं बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण पक्के शिवसैनिक आहात. शिवसेना सोडणार नाही, असं सांगताय. सध्याच्या सरकारविषयी तुमची भूमिका असेल तर त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. 24 तासात परत या, हे मी जबाबदारीनं परत सांगतोय. मी हवेत मी भूमिका मांडत नाहीये. उद्धव साहेबांसमोर बसू आणि तुमची भूमिका स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत.. .असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
आक्रमक शिवसेना एक पाऊल मागे घेणार?
कालपर्यंत, अगदी उद्धव ठाकरेंच्या भाषणातही शिवसेना महाविकास आगाडीशी फारक घेणार नाही, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. एकप्रकारे शिवसेनेचा आक्रमक बाणा यातून दिसून येत होता. मात्र आज आमदारांची इच्छा असेल तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहोत, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली. त्यामुळे आतापर्यंत आक्रमक असलेली शिवसेना एक पाऊल मागे आली, असंच म्हणावं लागेल.
‘भाजपकडून आमदारांचं अपहरण’
संजय राऊत म्हणाले, कोणत्या पद्धतीनं राज्यातील शिवसेनेच्या आमदारांचं भाजपने अपहरण केलं आहे. आपल्या कब्जात घेतलं आहे. मी फक्त भाजपचाच उल्लेख करतोय. सत्तास्थापनेसाठी आमदारांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मी त्यासंदर्भात वारंवार बोललो आहे. पण नितीन देशमुख आणि कैलास पाटील हेच या राज्यात कोणत्या प्रकारचं राजकारम सुरु आहे, खरं सांगतील. त्यामुळे त्यांना मी आज सर्वांसमोर आणलं आहे. राजकारणानं किती खालची पातळी गाठली आहे. … हे या आमदारांच्या बोलण्यावरून कळेल, असं संजय राऊत म्हणाले.