Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राज्यसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर अपक्षांवर का? मला शिवसेनेकडून ऑफर होती, देवेंद्र भुयारांचा गौप्यस्फोट
देवेंद्र भुयार म्हणाले, शरद पवारांना भेटून सांगणार आहे की, प्रामाणिकपणे मतदान करून ही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकारसोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहोत. त्यामुळे आमच्याबद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही.
नागपूर : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. या पराभवाचे खापर आता अपक्षांवर फोडले जात आहे. यासंदर्भात अपक्ष आणि राष्ट्रवादी समर्थित आमदार देवेंद्र भुयार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यसभेत पराभवच खापर माझ्यावर आणि अपक्ष आमदार यांच्यावर फोडलं जात आहे. अपक्ष आमदारांचा कोणी वाली नाही. सत्ता स्थापन्यासाठी आमचा वापर होतो. मला शिवसेनेकडून (Shiv Sena) ऑफर होता. मात्र मी आधीपासून राष्ट्रवादीसोबत ( NCP) होतो आणि आहे. आम्ही अपक्ष आमदार असल्याने आमच्याकडे शंकेने बघीतले जात आहे. मी आज शरद पवार (Sharad Pawar) यांना जाऊन भेटणार आहे. आमच्याबद्दल निर्माण केला जात असलेल्या गैरसमजाबद्दल त्यांना माहिती देणार असल्याचं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली
देवेंद्र भुयार म्हणाले, शरद पवारांना भेटून सांगणार आहे की, प्रामाणिकपणे मतदान करून ही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकारसोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहोत. त्यामुळे आमच्याबद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही. मी मुख्यमंत्र्यांसमोर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे माझ्याकडे शंकेने पाहिलं जात आहे. मी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं.
विजय झाला असता तर आम्हाला कोणी विचारलं नसतं
ते म्हणाले, पण मी हेही सांगितलं होतं की, मी मतदान महाविकास आघाडीलाच करणार. मात्र, पराभव झाल्याने आमच्यावर खापर फोडला जात आहे. विजय झाला असता तर आम्हाला कोणी विचारलं सुद्धा नसतं, अशी खंत भुयार यांनी व्यक्त केली. मात्र मी सुरवातीपासून महाविकासआघाडी सोबत आहे. महाविकास आघाडीलाच मतदान केले, असं मत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केलं. हे सारं सांगूनही महाविकास आघाडी सरकारचा अपक्षांवर डोळा आहे. कारण काही अपक्ष नाराज आहेत. विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. नाराजी व्यक्त करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही लोकांच्या विकासासाठी बोलतो. ज्या लोकांनी आम्हाला विश्वासानं निवडून दिलं त्यांचं काम करणं आमच्यासाठी आवश्यक आहे.