Maharashtra Rajya Sabha Election Results : त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही, दोन चार मतांची घासा घास झाली, निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
“मी तसेच शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल जिंकले आहेत. मी आमदारांचे आभार मानतो. (महाविकास आघाडी)चे चौथे उमेदवार संजय पवार जिंकू शकले नाहीत याचे आम्हाला दुःख आहे, असे प्रतापगढी म्हणाले.
मुंबई – महाराष्ट्रातील (maharashtra) राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहापैकी तीन जागा भाजपने जिंकल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी शुक्रवारी निवडणूक आयोग एका पक्षाच्या बाजूने असल्याचा आरोप केला. “निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैध ठरवले. आम्ही दोन मतांवर आक्षेप घेतला, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. निवडणूक आयोगाने त्यांची बाजू घेतली,” असे संजय राऊत म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला, तर महाविकास आघाडीत शिवसेने नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी असे तीन उमेदवार विजयी झाले. भाजपचे धनंजय महाडिक यांनी संजय पवार पराभूत केले. भाजप आणि सत्ताधारी युतीने क्रॉस-व्होटिंग आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्यानंतर राज्यात मतमोजणीला सुमारे 8 तासांचा विलंब झाला होता. क्रॉस व्होटिंगचा आरोप झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना या दोघांनीही मतांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.
पहिल्या पसंतीच्या मतांवर आमचा विजय झाला असता
त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं संजय पवारांना मिळाली आहेत. दुसऱ्या पसंतीच्या गणितावर त्यांचा विजय झाला आहे. त्यांनी एक जागा जिंकली, मोठा विजय झाला असे चित्र निर्माण केलं, मात्र तसं नाही. काही बाहेरची दोन, चार मतं आम्हाला मिळाली नाही. ती कोण आहेत हे आम्हाला माहिती आहेत. पण आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी ही जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केले. आम्हाला विश्वास होता ही जागा जिंकू, मात्र आता ठीक आहे. पहिल्या पसंतीच्या मतांवर आमचा विजय झाला असता. शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागा आम्ही जिंकलो. मात्र त्यांचा विजय झाला असे मी मानत नाही असं संजय राऊत यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मीडियाला सांगितलं आहे.
शिवसेनेचे संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला
“मी तसेच शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल जिंकले आहेत. मी आमदारांचे आभार मानतो. (महाविकास आघाडी)चे चौथे उमेदवार संजय पवार जिंकू शकले नाहीत याचे आम्हाला दुःख आहे, असे प्रतापगढी म्हणाले. महाराष्ट्रातील 6 जागांपैकी भाजपने 3 जागा जिंकल्या. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा जिंकली. शिवसेनेचे संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला.
महाविकास आघाडीच्या या आमदारांची मते अवैध ठरण्याची मागणी
भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या तीन आमदारांनी निवडणूक संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि त्यांची मते अवैध ठेवण्याची विनंती रिटर्निंग अधिकाऱ्याकडे केली होती. त्यामुळे मत मोजणीला तब्बल आठ तास उशीर झाला आहे.
भाजपने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांची मते अवैध ठरवण्याची मागणी केली होती.