Pankaj Bhujbal : नवनियुक्त आमदार पंकज भुजबळ कोण? राजकारणापलीकडे त्यांची ओळख काय?
Pankaj Bhujbal : पंकज भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे संचालक आणि मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव आहेत. नांदगाव तसा दुष्काळी भाग आणि मतदार संघ. या ठिकाणाहून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) तिकिटावर दोनवेळा विधानसभेवर गेले.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सुरु आहे. विधान भवनात शपथविधी सोहळा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर संधी मिळाली आहे. पहिल्यांदा पंकज भुजबळ विधान परिषदेवर जाणार आहेत. पंकज भुजबळ कोण आहेत? त्यांचा परिचय या बद्दल जाणून घेऊया. पंकज भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे संचालक आणि मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव आहेत. नांदगाव तसा दुष्काळी भाग आणि मतदार संघ. या ठिकाणाहून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) तिकिटावर दोनवेळा विधानसभेवर गेले. येथे पाणीप्रश्नावर काम केले. लघुपाटबंधारे, रस्ते, मनमाड पाणीप्रश्नी योजना तयार करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र, 2019 मध्ये त्यांना शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांची हॅट्रीक होता-होता राहिली.
या पराभवानंतरही पंकज भुजबळ यांचे काम जोरात सुरूय. राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध कार्यक्रम, आंदोलन आणि सतत लोकांच्या भेटीगाठीवर त्यांचा भर असतो. या वर्षी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात जो वाद झाला, त्या वादालही नांदगाव मतदार संघाची किनार होती.
उच्च विद्याविभूषित राजकारणी
पंकज भुजबळ हे उच्च विद्याविभूषित आहेत. खरे तर राजकारण ही त्यांची आवड, व्यवसाय म्हणाल तर शेती आणि शिक्षण अभियांत्रिकीतून पदव्युत्तरपर्यंत पूर्ण केलेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षामध्ये कार्यकरत आहेत. त्यांनी पक्ष संघटनेत विविध पदे सांभाळलीयत. युवा कार्यकारिणीवर ते होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही काही काळ त्यांच्याकडे होती. मुंबई एज्युकेशन ट्रस्टवर ते आहेत. ग्रामीण विकास, महिला सबलीकरण, व्यवसाय प्रशिक्षण आदी कामांमध्ये त्यांची रुची आहे. नाशिक जिल्ह्यात त्यांनी असे अनेक उपक्रम राबवले आहेत.
सामाजिक उपक्रम, संस्थांवर काम…
पकंज भुजबळ यांनी अनेक संस्थेवर काम पाहिले आहे. त्यात श्री सिध्दीगणेश संस्था, भायखळा भाजीपाला मार्केट प्रिमायसेस सोसायटी, माझगाव सेवा सहकारी संस्था, शिवडी सेवा सहकारी संस्था यांचा समावेश आहे. या संस्थांचे ते सल्लागार आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठीही आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यात विद्यार्थी सेवा संघ, एसएससी सराव परीक्षा व विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम आदींचा समावेश आहे. त्यांनी माझगाव मुंबई विभागात आरोग्य व नेत्रज्ञान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यांचे इतरही सामाजिक उपक्रम सुरू असतात.
संगीत, क्रिकेट, टेनिस…
पंकज भुजबळ पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांना निवडणुकीचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून केलेले काम आणि वडील छगन भुजबळ यांचा सहवास यातून ते बरेच काही शिकले. या बळावर त्यांनी दोन वेळा आमदारकी पटकावली. अनेक वादग्रस्त प्रकरणांतही त्यांचे नाव गोवले गेले. मात्र, पुढे त्यातून सहीसलामत सुटका झाली. मनाने पक्के राजकारणी असलेल्या पकंज यांना वाचनाची आवड आहे. तर संगीत, क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिसचे ते चाहते आहेत.