महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आज महानाट्य? शेकडो कार्यकर्त्यांसह मविआ नेते बेळगावात जाणार.. काय Updates?
महाराष्ट्रातील नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत कर्नाटकच्या शेकडो पोलिसांचा ताफा तैनात सीमेवर आहे.
कोल्हापूरः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात (Maharashtra Karnataka border issue) आज महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्याचवेळी महाराष्ट्र एकिकरण समितीचं महाअधिवेशनदेखील बेळगावात आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनाला शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने जाणार होते. मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आलाय. पण महाविकास आघाडीने आक्रमकता दाखवत बेळगावात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मविआचे तीन महत्त्वाचे नेते हजारो कार्यकर्त्यांसह बेळगावात जाणार आहेत.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास कर्नाटक सरकारने मनाई केली आहे. त्यातच आता बेळगावात मविआचे नेते आणि कार्यकर्ते जाणार असल्याने कर्नाटक सीमेवर मोठा राडा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र एकिकरण समितीच्या महामेळाव्याला मविआचे हसन मुश्रीफ, संजय पवार आणि विजय देवणे हे तीन नेते उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही बेळगावात जाणार आहेत.
त्यामुळे सीमावर्ती भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कागलमध्ये मविआचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत. कोगनोळी मार्गे ते बेळगावात जाण्याचा प्रयत्न करणार आहेत.
महाराष्ट्रातील नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत कर्नाटकच्या शेकडो पोलिसांचा ताफा तैनात आहे. तर सीमेवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीसदेखील सज्ज आहे.
कोल्हापुरातील कागल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी हे कार्यकर्ते बेळगावच्या दिशेने निघण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र एकिकरण समितीच्या महामेळाव्याला काही अटींवर बेळगाव प्रशासनाने मान्यता दिली आहे. मात्र कोणत्याही क्षणी ती रद्द करण्याची शक्यतादेखील आहे.
तर महाराष्ट्र सरकारतर्फे खासदार धैर्यशील माने महाराष्ट्र एकिकरण समितीच्या महावेळाव्याला उपस्थित राहणार होते. मराठी माणसांची लढाई जिवंत ठेवण्यासाठी, या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी मी तिथे जाणार असल्याचं काल धैर्यशील माने यांनी सांगितलं होतं.
या दौऱ्यासंबंधी त्यांनी कर्नाटक सरकारला कळवलं होतं. मात्र कर्नाटक सरकारने धैर्यशील माने यांच्या दौऱ्याला परवानगी नाकारली.