Devendra Fadnavis : अजित पवार दिल्लीत, एकनाथ शिंदे मुंबईत, असं का? अखेर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं सत्य
Devendra Fadnavis : काल रात्री दिल्लीत एक बैठक झाली. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये ही बैठक पार पडली, अशी बातमी सुरु आहे. पण एकनाथ शिंदे या बैठकीला नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागे काय घडतय, ते सांगितलं.
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. अनेक विषयांवर ते बोलले. “ही एक पद्धत आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची भेट घ्यायची असते. त्यानुसार मी भेट घेतली आहे. आज सकाळी माझी पंतप्रधानांबरोबर दीर्घ चर्चा झाली. त्यांचे आशिर्वाद घेतले, महाराष्ट्रासंदर्भात चर्चा झाली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्र एक देशातील महत्त्वाच राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेकरता हे राज्य गतीशील ठेवणं आवश्यक आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्राला संपूर्ण सहकार्य मिळेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह या नेत्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. रात्री जे.पी.नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाचा तिढा सुटला आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सर्वप्रथम म्हणजे मंत्रिमंडळाचा तिढा नाहीय. तुम्ही ज्या बातम्या चालवताय त्यावर मी स्पष्टीकरण देतो. अजित पवार त्यांच्या कामासाठी दिल्लीत आलेत. मी माझ्या कामासाठी आलो आहे. एकनाथ शिंदे यांचं काम नसल्याने ते आलेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे मुंबईत, आम्ही दिल्लीत असं काही नाहीय. कालपासून माझी आणि अजितदादांची भेटही झालेली नाही”
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात भाजपच्या बैठकीत काय चर्चा?
“मी माझ्या नेत्यांना भेटायला आलो आहे. आमच्या पक्षाकडून मंत्री कोण असेल? त्या संदर्भात आमची चर्चा झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून कोण मंत्री असतील, हे ते ठरवतील. आमच्या पक्षाकडून ज्यांना मंत्रिपद मिळू शकतं, त्या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. वरिष्ठ निर्णय घेतील” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काल रात्री दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते, अशी बातमी होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी आता अजित पवार या बैठकीत नव्हते हे स्पष्ट केलय.