Mahim Vidhan Sabha 2024 : माहीममध्ये उद्धव गटाने उमेदवार देण्यात अमित ठाकरेंचा फायदा, कसं ते समजून घ्या
Mahim Vidhan Sabha 2024 : माहीमची निवडणूक मुंबईतील बिग फाईट ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे, तेच शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर मैदानात आहेत. सदा सरवणकर तीन टर्मपासून आमदार आहेत. त्यांचं आव्हान सोपं नाहीय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी रात्री जाहीर केली. या यादीतील एका नावाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं, ते म्हणजे अमित ठाकरे. मागच्या काही वर्षांपासून अमित ठाकरे हे मनसेच्या विद्यार्थी शाखेची जबाबदारी संभाळत आहेत. विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अमित ठाकरे हे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आहेत. माहीममधून ते विधानसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. अखेर अपेक्षेप्रमाणे त्यांना तिकीट जाहीर झालय. माहीममधून मनसेकडे आणखी दोन चेहरे होते. संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई. यात संदीप देशपांडे हे वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लढणार आहेत. नितीन सरदेसाई यांच्यावर पक्षाकडून अन्य जबाबदारी देण्यात येईल. ते माजी आमदार आहेत.
माहीमची लढाई अमित ठाकरे यांच्यासाठी अजिबात सोपी नसेल. त्यांच्यासमोर तीन टर्मचे आमदार सदा सरवणकर यांचं आव्हान आहे. 2009 चा अपवाद वगळता सदा सरवणकर यांनी इथून सातत्याने निवडणूक जिंकली आहे. सदा सरवणकर यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंर्पक आहे. विशेष म्हणजे त्यांनी नगरसेवक ते आमदार असा प्रवास केला आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. कालच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकरांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे माहीमच्या लढतीकडे सगळ्या मुंबईच लक्ष असेल. माहीमची निवडणूक बिग फाईट ठरेल.
उलट उद्धव गटाने उमेदवार दिल्यास अमित ठाकरेंचा फायदा
अशी चर्चा आहे की, आदित्य ठाकरेंनी 2019 साली पहिल्यांदा निवडणूक लढवली, तेव्हा राज ठाकरेंनी वरळीमधून उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे गट 2024 मध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार न देऊन माहीममध्ये त्याची परतफेड करेल अशी चर्चा आहे. असं झाल्यास अमित ठाकरे यांचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न आहे. पण उलट उद्धव ठाकरे गटाने माहीम विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिल्यास अमित ठाकरे यांचा जास्त फायदा आहे. कारण तिरंगी निवडणूक होऊन मतविभाजन होईल. त्याचा थेट फायदा अमित ठाकरेंना होईल. 2009 मध्ये असच झाल्यामुळे नितीन सरदेसाईंनी मनसेच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती.
उद्धव गट माहीममधून कोणाला उमेदवारी देईल?
सदा सरवणकर यांचे माहीममधील कट्टर विरोधात महेश सावंत यांना इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ते उद्धव ठाकरे गटाचे माहीमचे विभागप्रमुख असून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
माहीमच्या मागच्या तीन विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकूया.
2009 माहीम विधानसभा निवडणूक निकाल
पक्ष | उमेदवाराचे नाव | एकूण मतं |
---|---|---|
मनसे | नितीन सरदेसाई | 48734 (विजयी) |
काँग्रेस | सदा सरवणकर | 39808 (पराभूत) |
शिवसेना | आदेश बांदेकर | 36364 (पराभूत) |
2014 माहीम विधानसभा निवडणूक निकाल
पक्ष | उमेदवाराचे नाव | एकूण मतं |
---|---|---|
शिवसेना | सदा सरवणकर | 46291 (विजयी) |
मनसे | नितीन सरदेसाई | 40350 (पराभूत) |
भाजपा | विलास आंबेकर | 33446 (पराभूत) |
2019 माहीम विधानसभा निवडणूक निकाल
पक्ष | उमेदवाराचे नाव | एकूण मतं |
---|---|---|
शिवसेना | सदा सरवणकर | 61,337 (विजयी) |
मनसे | संदीप देशपांडे | 42,690 (पराभूत) |
काँग्रेस | प्रवीण नाईक | 15,246 (पराभूत) |