कोणाचं काय नी कोणाचं काय!औरंगाबादचा तरुण म्हणतो, मला प्रभारी मुख्यमंत्री करा राव ! चक्क राष्ट्रपतींना ई-मेल
औरंगाबाद येथील तरुणाने आपल्याला मुख्यमंत्री करण्याची केवळ मागणीच केली नाही तर त्याने यासाठी सनदशीर आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. या पठ्ठयाने आपल्या मागणीसाठी चक्क राष्ट्रपतींना ई-मेल पाठविला आहे.
मंडळी, कुणाचं काय नी कुणाचं काय, आहो रावं जरा वातावरण काय आहे, ते तं समजून घ्यावा की. की काढली जीभ नी लावली एकदम टाळू ला. काळयेळ हाय की नाय, राव. काही जीभेला हाडं बीड हाय का नाय. हा औरंगाबादचा पठ्या तं लईच फार्मात आला हाय. इथं पाच दिसा पासनं पार राजकारणाचा इस्कोट (Political Crises) झालाया, नी हे बाबा म्हणतंय मला राज्याचा मुख्यमंत्री करा. काय म्हणतंय मुख्यमंत्री करा. अरं बाबा, पार इस्तू पेटला हाय, पार शिमगा झाला हाय नी याचं काय आपलं, ऊठला मुख्ममंत्रीपद(Make me chief Minister in charge) मागायला. ते काय किराणा दुकानावर मिळतंय व्हयं. लयं वंगाळ झाली बा लोकं. टकुरं पार आऊटं करत्याती ही माणसं. कुठून आणत असतील बरं एवढा कान्फिडंस (Confidence) म्हणतो मी. अरं काय म्हणतो काय, मागतुया काय आपणं, ते काय बिस्कूटचा पुडा हाय व्हय तुला द्यायला. लै बाबा लागून गेलाय जणू, म्हणं या राजकीय कल्लोळात, राज्य संभाळायला मला मुख्यमंत्री करा. अरं इथं कोणाच्या पायात कोणाचं खेटरं हाय त्याचा हिशेब लागना झालायं नी तू वाजवं आपली मुख्यमंत्री व्हायची पिपानी, म्हणजे हं कसं झालाय माहिती का, वजन मनभर नी आपली छाती पंक्चर.
चक्क राष्ट्रपतींकडे फिर्याद
औरंगाबाद येथील तरुण भारत आसाराम फुलारे यांनी आपल्याला मुख्यमंत्री करण्याची केवळ मागणीच केली नाही तर त्याने यासाठी सनदशीर आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. या पठ्ठयाने आपल्या मागणीसाठी चक्क राष्ट्रपतींना ई-मेल पाठविला आहे. हा तरुण पत्नी पीडित पतींसाठी हक्काचा निवारा मिळवून देण्याचं ही काम करतो. अनेकवेळा याने पतींच्या न्याय हक्कासाठी केलेली आंदोलनं राज्यभर गाजली आहे. पतींवर पत्नीकडून होणा-या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या तरुणाने अनकेदा केले आहे. त्यासाठी त्याने रीतसर संघटना तर काढलीच. पण अशा पत्नी पीडित तरुणांसाठी त्याने आश्रम ही काढला आहे. या पत्नी पीडित पुरुष संघटनेचा हा युवक अध्यक्ष आहे.
डावात मचाळा पार्टी
फुलारे यांचा स्वतःचा राजकीय पक्ष ही आहे. या पक्षाचे नावही तुम्हाला आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव डावात मचाळा पार्टी असं आहे. त्यांनी महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या डावात मचाळा करण्याचा निर्णय घेतला असून, या राजकीय मचाळ्यात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना कोणीच वाचा फोडत नसल्याने आणि त्यांचा प्रश्न आणि समस्या सोडण्यासाठी कोणीच पुढं येत नसल्याने जनता हतबल झाल्याचे सांगितले. जोपर्यंत राज्यातील राजकारण स्थिर स्थावर होत नाही. राजकीय गटबाजी शमत नाही. तोपर्यंत जनतेच्या हितासाठी आपल्याकडे सत्ता सोपवावी आणि आपल्याला मुख्यमंत्री पदाचा प्रभारी पदभार सोपवावा अशी मागणी या पठ्ठयाने केली आहे. ई-मेल द्वारे यासाठी त्यांनी थेट राष्ट्रपतींना साकडे घातले आहे. फुलारे यांची मागणी वरवर उपाहात्समक वाटत असली, चेष्टेचा विषय वाटत असली तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सर्वसामान्य जनतेची चीड ही व्यक्त होत आहे. त्यांची ही मागणी सध्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चेचा विषय ठरली एवढं मात्र नक्की.