मोदींना ‘नीच’ म्हटलेलं आता खरं ठरलं की नाही? : मणिशंकर अय्यर
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेल्या ‘नीच’ शब्दाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे. त्यांनी ‘द प्रिंट’ या न्यूज पोर्टलवर लिहिलेल्या लेखात मोदींसाठी वापरलेला ‘नीच’ शब्द खरा ठरल्याचे म्हणत त्याचे समर्थन केले. मणिशंकर अय्यर यांनी डिसेंबर 2017 मध्ये पंतप्रधान मोदींना नीच म्हटले होते. त्यानंतर त्यांनी याबद्दल माफीही मागितली होती. […]
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेल्या ‘नीच’ शब्दाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे. त्यांनी ‘द प्रिंट’ या न्यूज पोर्टलवर लिहिलेल्या लेखात मोदींसाठी वापरलेला ‘नीच’ शब्द खरा ठरल्याचे म्हणत त्याचे समर्थन केले. मणिशंकर अय्यर यांनी डिसेंबर 2017 मध्ये पंतप्रधान मोदींना नीच म्हटले होते. त्यानंतर त्यांनी याबद्दल माफीही मागितली होती. काँग्रेसनेही त्यांच्यावर 2 वर्षांची निलंबनाची कारवाई केली होती.
अय्यर यांनी लिहिलेल्या लेखात त्यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. जवाहरलाल नेहरुंच्या शिक्षणाचा संदर्भ देत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या शिक्षणावर आणि त्यांच्या अवैज्ञानिक मतांवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मूर्ख समजतात का, त्यांनी या अधिकाऱ्यांसमोर काहीही अवैज्ञानिक दावे करावेत? आणि त्या अधिकाऱ्यांनीही पंतप्रधानांना दुरुस्त करण्याचे धाडस दाखवू नये?”
पंतप्रधान मोदी केंद्रीय राखीव पोलीस दलासह (सीआरपीएफ) देशाच्या संरक्षण दलाचा आणि जवानांच्या बलिदानाचा वापर राजकारणासाठी करत आहेत. हे असे करणे म्हणजे देशविरोधी कृती असल्याचाही आरोप अय्यर यांनी केला.
काय म्हणाले होते मणिशंकर अय्यर?
पंतप्रधान मोदींनी आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली होती. त्यावर उत्तर देताना अय्यर यांनी मोदींचा उल्लेख ‘नीच’ असा केला होता.
डॉ. आंबेडकरांच्या स्मरणार्थ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन होत असताना पंतप्रधान मोदींनी गांधी कुटुंबावर घाणेरडी टीका केली. मला वाटतं मोदी खूप नीच स्वरुपाचा माणूस आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही सभ्यता नाही. अशा प्रसंगी एवढे घाणेरडे राजकारण करण्याची आवश्यकता नव्हती.