शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद नाकारलं, ‘त्या’ उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी मंत्री उदय सामंत आणि मंत्री दीपक केसरकर यांची साक्ष नोंदवली. यावेळी उदय सामंत आणि दीपक केसरकर या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत मोठं वक्तव्य केलं.

शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद नाकारलं, 'त्या' उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 8:19 PM

नागपूर | 11 डिसेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेची आज नियमित सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि मंत्री दीपक केसरकर यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी मोठा दावा केला. “उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख नव्हते तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ते चिरंजीव असल्याने त्यांनी पक्षप्रमुख म्हटलं जात होतं. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आणि आदर होता म्हणून उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हटलं जात होतं. 1999 च्या पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुख पद नसतानाही आम्ही उद्धव ठाकरे यांना पक्ष प्रमुख म्हणायचो”, असा मोठा दावा मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी फेरसाक्ष नोंदवत असताना केला.

वकील देवदत्त कामत यांनी उदय सामंत यांची फेरतपासणी घेत असताना 72 प्रश्न विचारले. अखेर 72 प्रश्नांच्या उत्तरानंतर उलट तपासणी संपली. त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता निर्णय वेळे आधीच लागण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत उलट साक्ष संपवा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या वकिलांना दिले आहेत.

दरम्यान, उद्याच्या सुनावणीत दीपक केसरकर, राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष होणार आहे. 13 ते 15 डिसेंबर दरम्यान लेखी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर १६ ते २० डिसेंबर दरम्यान होणार अंतिम सुनावणी होईल. मग 20 डिसेंबर नंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

नेमके सवाल-जवाब काय?

कामत – तुम्ही प्रतिज्ञापत्रात दिल्याप्रमाणे तुम्ही निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या महाविकास आघाडीमुळे नाराज होता, हे खरे की खोटे?

सामंत – होय, मी नाराज होतो.

कामत – तुम्ही २०१९ ते जून २०२२ पर्यंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पद भुषविण्याइतपत नाराज होता का?

सामंत – ज्यावेळी मी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यापूर्वी देखील गटनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला असे आश्वासन देण्यात आले होते की जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो, भविष्यात तशीच कार्यवाही होईल. नक्की पुन्हा काही कालावधीनंतर तुमची मागणी मान्य केली जाईल. भाजपसोबत सरकार स्थापन केले जाईल, असे आश्वासन दिले गेले. म्हणून मी मंत्री मंडळात सामील झालो.

कामत – उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युती करावी म्हणून भेटला आहात असे नमूद केले. तुम्ही एकनाथ शिंदे यांना तशी विनंती का केली नाही?

सामंत – मी आणि माझ्या आमदार सहकाऱ्यांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. आमच्या मागणीनुसार गटनेते एकनाथ शिंदे देखील अनेकवेळा उद्धव ठाकरे यांना भेट घेऊन हे सांगितले होते. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

कामत – तुम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केली कारण उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख होते. ते शिवसेना राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व करत होते. हे चूक की बरोबर?

सामंत – बरोबर.

कामत – उद्धव ठाकरे यांना तुम्ही 2019 मध्ये भाजपसोबत युती करावी यासाठी भेटला होता असं तुम्ही म्हणत आहात मग तुम्ही एकनाथ शिंदे यांना ही विनंती तेव्हा का नाही केली?

उदय सामंत -आम्ही गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. आमच्या मागणीनुसार एकनाथ शिंदे यांनीही ऊद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगितले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

कामत- मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती की भाजपसोबत युती करावी. कारण उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते आणि ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. हे खरे आहे का?

उदय सामंत – हे बरोबर आहे.

कामत- 21 जून 2022 रोजी तुम्ही वर्षा बंगल्यावरील बैठकीला हजेरी लावली कारण तुम्हाला 21 जून 2022 रोजी सुनील प्रभू यांनी व्हिप बजावला होता. हे खरे आहे का?

सामंत- 21 तारखेला माझे विधिमंडळातील सदस्य गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बैठक असल्याचे मला सांगितले आणि निमंत्रण दिले. पण ही बैठक कशासंदर्भात आहे हे सांगितले नव्हते. मी या बैठकीला उपस्थित होतो. पण त्यादिवशी किंवा त्यानंतर मला कुठलाही व्हिप देण्यात आलेला नाही. मी तो स्वीकारलेला नाही. आणि कोणतीही सही कुठच्याही कागदावर केलेली नाही.

कामत – तुम्ही जेव्हा म्हणता की बहुसंख्य पक्ष संघटन म्हणता तेव्हा निवडून आलेले लोकप्रतिनिधी असं आपल्याला म्हणायचं आहे का?

सामंत – म्हणजे आमदार, खासदार, विधानपरिषद सदस्य, पक्ष संघटनेचे पदाधिकारी

कामत – 21 जून 2022 मधील हा पक्षादेश प्राप्त झाला हे सांगितले होते हे चूक की बरोबर?

सामंत – मी आधीच सांगितले आहे की, ही सही माझी नाही. हा व्हीप मी स्वीकारलेला नव्हता.पण माझ्या मर्यादित माहीतीनुसार व्हीप हा सभागृहातील कामकाजासाठी किंवा मतदानासाठी असतो. आता माझ्या हातात जो कागद ठेवलेला आहे त्यावरून मला असे वाटते की, हा व्हीप नसून ते पत्र आहे. त्यावर असलेली सही माझी नाही. त्यामुळे तो स्वीकारायचा प्रश्नच नाही. असा कागद निमंत्रण किंवा पत्र खाजगी कार्यक्रमाचे देखील निघू शकते.

कामत – ज्या कथित 24 स्वाक्षरी आहेत, त्यांपैकी एक तुमची स्वाक्षरी आहे का?

सामंत – नाही

कामत – या कागदपत्रात २४ स्वाक्षरी आहेत का?

सामंत – आपण जो कागद माझ्या हातात दिला आहे, त्यावरील स्वाक्षरी मोजल्या तर त्या २४ आहेत. पण त्यावर माझी सही नाही.

कामत – सामंत यांना अपात्रता याचिका दाखवा. या १९ क्रमांकाच्या याचिकेत तुम्ही दिलेल्या उत्तरात शिवसेना विधीमंडळ पक्षाची एक अनधिकृत बैठक आयोजित केली होती. त्यात ५५ पैकी कथित २४ आमदारांनी त्यास हजेरी लावली होती, असे हा आपण म्हटला आहात. जर तुम्ही त्या बैठकीच्या हजेरी पत्रकावर सही केली नाही, तर तुम्ही असा उल्लेख का केला आहे?

सामंत – मी त्यामध्ये कथित हा उल्लेख केला आहे. जी काही कागदपत्रे मला आता दाखविण्यात आली त्यावरील सही देखील मी केलेली नाही.

कामत – हे उत्ततर तुम्ही देत आहात म्हणजे याआधी तुम्हाला दाखवलेले पत्र याआधी कधी पाहिले नव्हते?

सामंत – मी मागील उत्तरात म्हटले आहे की माझ्या हातामध्ये जे सह्यांचे कागद देण्यात आले त्यावरील सही माझी नाही.

कामत – थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दाखवलेला हा कागद आजच्या दिवसापूर्वी तुम्ही कधी पाहिला आहे का?

सामंत – आजच्या दिवसापूर्वी नाही पाहिला.

कामत – याचा अर्थ अपात्रता याचिका तुम्ही ऑगस्ट २०२३ रोजी दाखल करताना आणि २४ नोव्हेंबर २०१३ रोजी तुमचे प्रतिज्ञापत्र सादर करताना तुम्हाला या कागदपत्राबाबत कल्पना नव्हती?

सामंत – हे कागदपत्रे आता पाहत असलो तरी माझ्या वकिलांनी उत्तर देताना मला माहिती दिली होती. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे २१ तारखेच्या बैठकीनंतर ज्यावेळी मी माझ्या शासकीय निवासस्थानी आलो; त्यावेळी देखील मी सोशल मीडिया आणि टीव्हीवर असे पाहिले की, मी कोणत्याही कागदपत्रावर किंवा व्हीपवर सही न करता देखील त्यावेळी माझ्या नावाचा उपयोग करून एकनाथ शिंदे यांना हटविण्याची कार्यवाही करण्यात आली होती.

कामत – तुमचे उत्तर दाखल करताना, तुमच्या वकिलांनी आपल्याला या कागदपत्राबाबत कल्पना दिली होती. मग तुम्ही या कागदपत्रावर सही केली नाही, असा इन्कार तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्रात का केला नाही?

(ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये पुन्हा जुंपली, चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारत असल्याचा आक्षेप, देवदत्त कामत यांचा शिंदे गटाच्या वकिलांना टोला, “प्रतिज्ञापत्रात खराब उत्तर दिल्यामुळे असे प्रश्न विचारत आहेत – कामत” “होपलेस पिटिशनला अशीच उत्तर द्यावी लागतात – हर्षल भडभडे”, शिंदे गटाचे वकील हर्षल भडभडे यांकडून कडवे प्रत्युत्तर)

उदय सामंत – याचे उत्तर मी आधीच दिले आहे, कारण सहीच्या बाबतीतील कागदपत्रांवर मी सही केलेली नाही या बाबीवर मी ठाम आहे.

कामत – तुमची या हजेरी पत्रकावर सही नाही, याचा इन्कार तुम्ही दाखल केलेल्या याचिकेत उत्तर देताना केला नाही, कारण ही तुमचीच सही आहे. हे बरोबर आहे का?

सामंत – याच्याशी मी सहमत नाही. ती सही माझी नाही.

कामत – २१ जून २०२१ रोजी जी बैठक झाली, त्यावेळच्या हजेरी पत्रकावर तुमची सही नाही, असे तुम्ही म्हणत आहात. हे तुम्हाला नंतर सुचलं असून तुम्ही खोटं बोलत आहात. हे योग्य आहे का?

सामंत – हे चुकीचे आहे.

कामत – २२ जून २०२२ रोजी आयोजित बैठकीत तुम्ही उशीरा पोहचला, आणि आपल्या कर्मचाऱ्याने त्याचा फोटो कॉपी घेतल्यानंतर तुम्ही त्यावर सही केली. हे खरे आहे का?

सामंत – हे चुकीचे आहे. २२ जून २०२२च्या बैठकीत मी उपस्थितच नव्हतो.

कामत – mlaoffice99@gmail.com हा ईमेल आयडी आपला आहे का?

सामंत – होय

कामत – २ जुलै २०२२ रोजी तुम्हाला तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर विजय जोशी यांच्या ईमेल आयडीवरून सुनील प्रभू यांनी जारी केलेले २ व्हीप मिळाले होते. हे खरे आहे का?

सामंत – हे चुकीचे आहे. माझ्या मेल आयडी वर मला कुठलाही व्हीप मिळालेला नाही.

कामत – राजन साळवी हे शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत निवडणूक आलेले आहेत, हे तुम्हांला माहीत आहे का?

सामंत – होय

कामत – तुम्ही भाजपचे राहुल नार्वेकर यांना ३ जुलै २०२२ रोजी विधानसभा अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत मतदान केले होते का?

सामंत – अध्यक्ष पदाची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीत मी माझ्या सद्सदविकेबुद्धी प्रमाणे राहुल नार्वेकर यांना मतदान केले होते. कारण महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज ते योग्य तऱ्हेने चालवतील, अशी खात्री होती.

(कोण ‘नाही’ सांगणार… राहुल नार्वेकर यांची कोपरखळी, सभागृहात सुनावणी दरम्यान एकच हास्यकल्लोळ)

कामत – अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना विधीमंडळ पक्षाने व्हीप काढला नव्हता, असे आपल्याला म्हणायचे आहे का?

सामंत – मला मिळालेला नाही. बाकी मला माहिती नाही.

कामत – तुम्हाला कुठलाही व्हीप मिळाला नाही, ही तुम्ही चुकीची साक्ष देत आहात. तुम्हाला सुनील प्रभू यांनी २ जुलै २०२२ रोजी जारी केलेला व्हीप मिळाला होता. हे खरे आहे का?

सामंत – चुकीचे आहे.

कामत – ४ जुलै २०२२ रोजी बहुमत विश्वासदर्शक ठरावावेळी तुम्ही एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले का?

सामंत – होय

कामत – विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे तुम्ही २ जुलै २०२२ रोजीच्या सुनिल प्रभू यांच्या व्हीपचे उल्लंघन करत अपात्रतेची कारवाई स्वतः वर ओढवून घेतली आहे.

सामंत – खोटे आहे, चुकीचे आहे

कामत – आपण किंवा इतर कुठल्याही आमदाराने महाविकास आघाडी संपुष्टात आणा, अशी विनंती केली नव्हती. हे खरे आहे का?

सामंत – ते चुकीचे आहे. आम्ही विनंती केली होती.

कामत – पक्षातील लोक प्रतिनिधी व पदाधिकारी हे खूप वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडत होते, असे आपण म्हणता आहात. मग किती वर्षांपासून ही गाऱ्हाणे मांडली जात होती?

सामंत – काळ मोठा होता, पण स्पेसिफिक मला आता आठवत नाही.

कामत – तुम्हाला सुमारे सांगता येईल का?

सामंत – मला आठवत नाही.

कामत – तुम्ही याआधीच्या उत्तरात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसेना नेते म्हणून केला. ते एकटेच शिवसेना नेते होते की अनेक नेत्यांपैकी एक होते?

सामंत – सुरुवातीला मी उत्तरात सांगितले की शिवसेना नेत्यांची जेवढी नावे मला आठवतात, तेवढी नावे मी सांगितली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे देखील नाव होते. मी सन २००४ मध्ये विधानसभा सदस्य झालो, त्यावेळी पासून देखील ते शिवसेना नेते आहेत.

कामत – तुम्ही प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे की, “पक्षाच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं” हे चूक आणि तथ्यहीन आहे

सामंत – हे चुकीचं आहे. मी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली पाहिजे. 1999 च्या अमेंडमेंटमध्ये पक्ष प्रमुख हे पद नसताना देखील पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आम्हाला सर्वांना आदर होता. म्हणून पक्ष प्रमुख असा उल्लेख आमच्याकडून होत होता. तरी देखील आमदारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क नसल्याने लोकप्रतिनिधी तसंच पदाधिकारी आपल्या सर्व अडीअडचणी गेली कित्येक वर्षे शिवसेनेचे नेते म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडायचे, आणि शिवसेना नेते म्हणून एकनाथ शिंदे सर्वांना न्याय द्यायचे.

कामत – एकनाथ शिंदे हे केव्हा आणि कसे नेते बनले याची आपल्याला कल्पना नाही, असे आपल्याला म्हणायचे आहे का?

सामंत – कल्पना नाही.

कामत – तुम्ही म्हटलं की पक्षाचे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी मांडत होते. हा कुठला काळ होता?

सामंत – तसं बरंच वर्षांपासून, पण आता आठवत नाही.

कामत – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे असं तुम्ही म्हणत आहात तेव्हा ते शिवसेनेचे एकमेव नेते आहेत की अनेकांपैकी एक आहेत?

सामंत – सुरुवातीच्या उत्तरात शिवसेना नेत्यांची नावं सांगितली होती. त्यात एकनाथ शिंदे यांचंही नाव होतं. 2004 रोजी मी जेव्हा विधानसभेचा सदस्य झालो. त्यावेळी पासून ते शिवसेनेत आहे.

कामत – शिवसेना पक्षात नेते पदाच्या निवडीसाठी काही प्रक्रिया आहे का?

सामंत – मला हे माहिती नाही.

कामत – मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही रेकाॅर्डवरती कोणतंही डॉक्युमेंट सबमीट केलेलं नाही ते जे सांगू शकेल की 2018 च्या आधी एकनाथ शिंदे हे शिवसेना राजकीय पक्षाचे नेते होते. हे बरोबर आहे का?

सामंत – हे चूक आहे.

कामत – 23 जानेवारी 2018 रोजी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नेते केलं. हे बरोबर आहे का?

सामंत – मला आठवत नाही.

कामत – क्रमांक 56 चे उत्तर देताना तुम्ही म्हटलंय की “we address Uddhav Thackeray as Paksha pramukh.”. ‘पक्ष प्रमुख’ हा शब्द कुठून घेतला?

सामंत – काही नेते मंडळींची इच्छा होती आणि आदरापोटी सर्वांनी ते उचलून धरले.

केसरकर उलटसाक्षमध्ये नेमकं काय म्हणाले?

कामत – महा विकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर भाजपसोबत युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार होते? हे खरे आहे का?

केसरकर -होय, ते मुख्यमंत्री असल्याने त्यांना निर्णय घ्यायचा होता.

कामत – उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, आणि ते शिवसेना पक्षप्रमुख असल्यामुळे शिवसेनेतर्फे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना होते. हे खरे आहे का?

केसरकर – त्यांना मुख्यमंत्री म्हणून निर्णय घ्यायचा होता आणि त्यांना त्याची माहिती राज्यपालांना द्यायची होती. ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असल्याने आम्ही त्यांना आदराने पक्षप्रमुख म्हणून संबोधित करायचो. मला निवडणूक आयोगातील त्यांचे पद माहिती नव्हते.

कामत – महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर भाजपसोबत युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार होते? हे खरे आहे का?

केसरकर – होय, ते मुख्यमंत्री असल्याने त्यांना निर्णय घ्यायचा होता.

कामत – उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याआधी महाविकास आघाडी सरकारने सामील होण्याचा निर्णय शिवसेना राजकीय पक्ष म्हणून कोणी घेतला?

केसरकर – मला माहिती नाही

कामत – उद्धव ठाकरे यांच्या आधी शिवसेना राजकीय पक्षाचा पक्ष प्रमुख कोण होते?

केसरकर – मला माहिती नाही

कामत – उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख आणि पक्षाचे अध्यक्ष होते. शिवसेना राजकीय पक्ष म्हणून तेच निर्णय घेत होते. हे खरे आहे का?

केसरकर – मला माहिती नाही

कामत – महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत युती करण्याचा निर्णय ते मुख्यमंत्री असल्यामुळे नव्हे तर शिवसेना राजकीय पक्ष प्रमुख आणि अध्यक्ष असल्याने घेऊ शकत होते. हे खरे आहे का?

केसरकर – मला माहित नाही

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.