‘युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या’, रोहित पवारांचा घरचा आहेर
विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. रोहित पवार आज अहमदनगरमध्ये बोलत होते.
अहमदनगर : आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा मेसेज मिळाला. त्यामुळे राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जातोय. विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. रोहित पवार आज अहमदनगरमध्ये बोलत होते. (Rohit Pawar criticizes Mahavikas Aghadi government after postponing health department exams)
‘लवकरात लवकर म्हणजे काही दिवसांत परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. ज्या काही त्रुटी आहेत त्या सोडवाव्यात. त्यासाठी एखादा वरीष्ठ अधिकारी नेमावा. आणि ज्यावेळी परीक्षा घेतली जाईल तेव्हा सर्वसामान्य मुलं एसटीचा प्रवास करतील तो तिकिटाचा खर्चही सरकारच्या माध्यमातून कसा देता येईल याबाबत विचार करावा. पण काहीही झालं तरी युवकांच्या भविष्याशी कुठल्याही सरकारनं खेळू नये, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राजेश टोपे साहेब यात लक्ष घालत आहेत. लवकरात लवकर परीक्षा होतील, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.
परीक्षा घेण्यास कंपनी असमर्थ, आरोग्यमंत्र्यांनी दिलं कारण
दरम्यान, परीक्षा घेण्यास कंपनी असमर्थ आहे, असं कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी माफीही मागितली. पण प्रश्न इथेच संपत नाही. ज्या कंपनीमुळे हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला, आर्थिक भुर्दंड सोसावा लागला, ती कंपनी नेमकी कुणाची, कुठली, जर कंपनी परीक्षा घेण्यास असमर्थ होती, तिच्या कारभारावरट पहिल्यापासून प्रश्नचिन्ह होतं तर तिला कंत्राट का दिलं?, असे सवाल आता विद्यार्थी विचारु लागले आहेत.
कंपनी नेमकी कुठली?
आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र या परीक्षेच्या नियोजनाचं काम ज्या न्यासा कम्युनिकेशन या कंपनीला आरोग्य विभागाने दिल होतं त्या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. या कंपनीबाबत माहिती घेतली असता ही मूळ दिल्लीची कंपनी असून अशा प्रकारच्या परिक्षांचे आयोजन त्यासोबत परीक्षांचे नियोजन करण्याचं काम ही कंपनी करते.
परीक्षा होणारच, जाहीर केलेल्या जागा भरणारच, त्रासाबद्दल माफी मागतो- टोपे
आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलण्यात आलेली आहे. जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे. कंपनीने असमर्थता दाखविल्यमुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. पण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मी विद्यार्थ्यांची माफी मागतो. पण विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांत परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल, असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं.
इतर बातम्या :
Rohit Pawar criticizes Mahavikas Aghadi government after postponing health department exams