Sunil Raut | संजय राऊतांच्या भोंग्यामुळेच शिंदेंना मंत्रिमद मिळालं, सुनिल राऊतांची टीका
पत्राचाळ पुनर्विकास आणि एफएसआय गैरव्यवहारात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून काम करत होते, असा दावा ईडीने केला आहे.
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या भोंग्यामुळेच एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) नगरविकास मंत्रिपद मिळालं. मात्र आता राऊतांचा भोंगा बंद करण्यासाठीच त्यांच्याविरोधात ईडीचं कटकारस्थान सुरु असल्याचा आरोप बंधू सुनिल राऊत (Sunil Raut) यांनी केलाय. आज सुनिल राऊत यांनी पत्रकारांसमोर प्रतिक्रिया दिली. भाजपतर्फे शिवसेनेविरोधात सूडाचं राजकारण केलं जातंय. लोक हजारो कोटी रुपये घेऊन फरार होतात, पण त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. आम्ही नियमानुसार व्यवहार केला असूनही काहीतरी कारण काढून संजय राऊतांना अडकवलं जात आहे. त्यासाठीच त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असल्याचा आरोप सुनिल राऊत यांनी केलाय. ईडीच्या विशेष कोर्टानं काल संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ केली. 8 ऑगस्ट पर्यंत संजय राऊतांना कोठडी देण्यात आली आहे. मागील चार पाच दिवसात ईडीने आणखी छाननी केली असता काही संशयास्पद कागदपत्र आढळले असून त्याच्या चौकशीकरिता राऊतांची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी कोर्टासमोर करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली.
सुनिल राऊत काय म्हणाले?
एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करताना सुनिल राऊत म्हणाले, ‘ जे आज मंत्री झाले त्यांनी कारवाईला घाबरून आपले भोंगे बंद केलेत. परंतु संजय राऊत यांच्यामुळेच यापुर्वी हे मंत्रीपदावर आले होते. संजय राऊत यांचे वय 61 आहे. इतकेवर्ष त्यांनी काही काम केले नाही का? भाजप संजय राऊत यांच्या भोंग्याला घाबरून कारवाई करतंय. हे सूडाचं राजकारण सुरु आहे, हे स्पष्ट आहे. मात्र या सर्वांवर मात करत सत्याचा विजय होणार असून राऊतांची सुखरूप सुटका होईल. त्यानंतर शिवसेना प्रमुखांना उध्दव ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवणार..आम्ही झुकणार नाहीत, असा इशारा सुनिल राऊतांनी दिला.
‘राऊतांवरचे आरोप खोटे’
संजय राऊत यांच्यावरील आरोप खोटे असल्याचं सुनिल राऊत यांनी पुन्हा एकदा सांगितलं ते म्हणाले, ‘ जमिनीवरून विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचा फॉर्म भरला होता, तेव्हा तिचे मूल्य 1 कोटी 6 लाख रुपये होती. रेडी रेकनरखाली जमीन घेतलेली नाही. काहीच गैर व्यवहार नाहीये. पण त्यांना काहीही करून संजय राऊत यांना अडकवायचं आहे. ती लिंक लागत नाहीये, म्हणून संजय राऊतांची कोठडी आणखी वाढवण्यात आली आहे…
वर्षा राऊत यांनाही समन्स
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनादेखील सक्तवसुली संचलनालयाने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीने त्यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. पत्राचाळ प्रकरणी प्रवीण राऊत यांना 112 कोटी रुपये पाठवण्यात आले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आले होते, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ईडीचा दावा काय?
पत्राचाळ पुनर्विकास आणि एफएसआय गैरव्यवहारात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून काम करत होते, असा दावा ईडीने केला आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने प्रवीण राऊत यांनी म्हाडाकडून पत्राचाळ पुनर्विकासासाठी मंजुरी मिळवल्या. त्यानंतर मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरित्या मिळवलेल्या 112 कोटी रुपयांपैकी 1 कोटी 6 लाख रुपये हे संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या खात्यावर थेट गेले असल्याचा आरोप ईडीतर्फे करण्यात येत आहे. ही रक्कम आणखी जास्त असू शकते, असा संजय व्यक्त करण्यात येतोय.