वाटलं, आमदार झाल्यावर उत्साहात दिवाळी साजरी करु पण…, वडिलांच्या आठवणीने अमोल मिटकरी भावूक
लक्ष्मीपूजनादिवशी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या बाबांना पत्र लिहून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मुंबई : दिवाळीच्या मंगलमय सणात आपलं माणूस आपल्यात नसलं की दु:खी व्हायला होतं. आपल्या माणसांसंबंधी मनात आठवणींचं काहूर माजतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिवंगत आईस पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. लक्ष्मीपूजनादिवशी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या बाबांना पत्र लिहून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसंच बाबांच्या हयातीतली त्याकाळची दिवाळी आणि आता आमदार झाल्यानंतर स्वत:ची प्रथम दिवाळी, याचा अनुभव मिटकरींनी फेसबुक पोस्टच्या रुपाने मांडला आहे. (MLC Amol Mitkari Wrote A Letter to his Father)
अमोल मिटकरी म्हणतात…
“प्रिय बाबा, आज तुमच्या गैरहजेरीतील तिसरी दिवाळी. दसरा संपला की दिवाळी येईपर्यंत तुमची किराणा दुकानदार म्हणून प्रचंड धावपळ चालायची. जुन्या मातीच्या दुकानाची साफसफाई, दुकानासमोर रोज सडासंमार्जन, कमालीची स्वच्छता, ग्राहकांची दुकानात सकाळपासून उसळलेली गर्दी, दुकानाची रंगरंगोटी, ‘लाभ शुभ’ काढण्यापासुन अगदी काटेकोर नियोजन होतं. तुमच्या एकट्याच्या संघर्षात मात्र माझा हातभार असायचा. सकाळी लवकर उठायची सवय लागावी म्हणून काकड-आरतीसाठी तुम्ही शिव्या घालून उठवायचे. एक कडक शिस्त लागावी म्हणुन आपला हा धावपळीचा काळ मला खूप काही शिकवून गेला.”
“तिन्ही भावांची लग्न आटोपल्यावर सर्व घर कसं भरून गेलं याचा आनंद तुम्हाला खूप जास्त होता. घरात नातवंड आली. सुना आल्या, घरी गाई -वासरं, बैलजोडी, कामावर गडी माणसं, गावात आदर, लोकांसोबत दांडगा जनसंपर्क असा भक्कम व्यासंग तुम्ही निर्माण केलेला. आमच्या सासरकडील मंडळी आली की आपल्याला आनंद व्हायचा. मुलगी आणि जावई दिवाळी आटोपून रवाना झाले की तुम्ही हळवे व्हायचे. म्हणायचे, ‘लेकीची माया वेगळीच असते’. मला मुलगी झाल्याचा सर्वात जास्त आनंद तुम्हाला आणि तुम्हालाच झाला होता. अखंड कष्ट व मेहनतीने तुम्ही सर्व साध्य केल होतं बाबा…”
“दिवाळी आली की सगळी लगबग चालायची. माझ्यावर तुमचा असणारा प्रचंड राग… मात्र तितकंच मनातून प्रेम… मला स्पष्ट जाणवायचं. दिवाळीचा फराळ सर्व सूना मिळून करा. सकाळी उटणे लावण्यापासुन सायंकाळी सुनांना फटाके फोडायला प्रोत्साहित करणारा सासरा वजा बाप सर्व कुटुंबाने अनुभवला. एका दिवाळीत मी सराफाच्या दुकानात गेलो आणि तुमच्यासाठी सोन्याची तुळशीची माळ बघितली. वाटलं दिवाळीसाठी घेऊन जाऊ, मात्र मला माझ्या कष्टाच्या पैशातून ती घ्यायची होती व त्यावेळी तेवढी माझी ऐपत नव्हती. आज तुमच्या पुण्याईने आमदारकी मिळाली. पण माझा देव आज नाही. तुळशीमाळ घ्यायला आज पैसे आहेत बाबा पण ज्याला ती अर्पण करावी म्हणतो तो – तो गळा आज हरवला. नेहमी स्वच्छ कपडे घालणारे तुम्ही आज मी आणलेले कपडे घेऊन खूष झाले असते”.
“बाबा सालाबादप्रमाणे दिवाळी आली व ती नागिणीसारखी डसायला लागली. वाटलं आमदार झाल्यावर आनंदात दिवाळी साजरी करू. पण बाबा तो आनंद हवेत विरला कायमचा…. लोकांमध्ये राहुन तो शोधण्याचा प्रयत्न करत राहील. बाबा जिथे कुठे असाल तिथे सुखात रहा. कारण जमिनीवर कष्ट करताना आराम भोगलाच नव्हता. हरवलेल्या गर्दीत कधीतरी भेटाल व अमोल म्हणून आवाज द्याल या भाबड्या आशेवर कायम राहील… हॅप्पी दिवाली बाबा… तुमचा अभागी पुत्र आ. अमोल रामकृष्ण मिटकरी….”
(MLC Amol Mitkari Wrote A Letter to his Father)
संबंधित बातम्या
पद्मविभूषण पुरस्काराच्या सन्मानावेळी तुमच्या आठवणींनी गहिवरलो, शरद पवारांचं आईला भावनिक पत्र