MLC Election 2022 VIDEO | भाजपचे बावनकुळे आधी धनंजय मुंडेंच्या कानाला लागले नंतर गळाभेट! कुणाचा गेम ठरतोय पक्का थेट?
बावनकुळे यांनी आधी धनंजय मुंडेंच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर गळाभेटही घेतली. ऐन मतदानाची वेळ आणि महाविकास आघाडीच्या आमदाराला भाजपने कानात हे गुपित सांगितलं... कानगोष्टीत नेमकं कुणाचं नाव होतं.. इसकी चर्चा तो बनेगी ना...
मुंबईः आमच्या पाचही जागा निवडून येणार, असं छातीठोकपणे सांगणारे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज विधान भवनात अत्यंत आत्मविश्वासाने वावरताना दिसतायत. विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपने या निवडणुकीत पाच आमदारांना (BJP Candidate) उतरवलं आहे. चार आमदारांना जिंकवून आणण्यासाठीचं संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र पाचवाही उमेदवार जिंकून येणार अशा आविर्भावात भाजपचे नेते आहेत. त्यातच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हालचाली सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. अगदी सऱ्हाइतपणे ते अजित पवारांपासून इतर अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेत आहेत. सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांची केबिनमध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यानंतर विधान भावनात राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आले तेव्हाची भेट तर चांगलीच रंगवून सांगितली जातेय. धनंजय मुंडे गाडीतून उतरताच बावनकुळे यांनी आधी त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर गळाभेटही घेतली. ऐन मतदानाची वेळ आणि महाविकास आघाडीच्या आमदाराला भाजपने कानात हे गुपित सांगितलं… कानगोष्टीत नेमकं कुणाचं नाव होतं.. इसकी चर्चा तो बनेगी ना…
काय घडलं नेमकं?
विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या भेटीची ही दृश्य अनेकांच्या डोळ्यांनी आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपली. मतदानासाठी आलेल्या धनंजय मुंडे यांच्या कानात बावनकुळे यांनी काहीतरी कानात सांगितलं. नंतर उघडपणेही काहीतरी बोलले. धनंजय मुंडे यांनी होकारार्थी मान हालवली अन् शेकहँडही केलं. या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या आत्मविश्वासात तिथून निघून गेले. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या भेटीत नेमका कुणाचा गेम करायचा ठरलं? असा प्रश्न आता चवीनं चर्चिला जातोय.
कुणाचा गेम होणार?
राष्ट्रवादीक काँग्रेसने या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. जळगाव भाजपचे एकेकाळचे तगडे नेते असलेले खडसे उर्फ नाथाभाऊ आता राष्ट्रवादीत आहेत. खरं तर खडसेंचा पराभव करण्याची सुपारी भाजपने राष्ट्रवादीला दिल्याची चर्चा निवडणुकीपूर्वी जोरदार सुरु होती. असं काहीही नसल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्टीकरण दिलं होतं. पण ऐन मतदानाच्या दिवशी त्यातच भाजपचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कानात अशा गुजगोष्टी करू लागल्यावर कुणाच्या मनात शंका येणारच.
राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकणार?
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. मतांचा कोटा 26 आहे. तर राष्ट्रवादीकडे मतांची संख्या 51 आहे. दोन उमेदवार विजयी होण्यासाठी फक्त एका उमेदवाराची गरज आहे. धुळ्याचे एमआयएमचे आमदार फारुख शहा आणि अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादीसाठी मतदान करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे फार मतं फुटली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येणं फारसं अवघड नाही.