पंकजा मुंडेंना मंत्रालयाच्या गेटवर रोखणारे रामराव वडकुते कोण?
मुंबई: धनगर आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयाच्या गेटवर वाट अडवण्यात आली. पंकजा मुंडे आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात आल्या होत्या. त्यावेळी धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रालय प्रवेशापासून रोखलं. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर आम्हाला पुन्हा मंत्रालयात जाता येणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी […]
मुंबई: धनगर आरक्षणाबाबतच्या वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयाच्या गेटवर वाट अडवण्यात आली. पंकजा मुंडे आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात आल्या होत्या. त्यावेळी धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रालय प्रवेशापासून रोखलं.
धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर आम्हाला पुन्हा मंत्रालयात जाता येणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी नांदेडमधील सभेत केलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे आज मंत्रालयात आल्या. मात्र आमदार रामराव वडकुते यांनी पंकजांची वाट रोखली. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवा, त्यानंतरच मंत्रालयात पाय ठेवा, असा इशारा यावेळी आमदार वडकुते यांनी दिला.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
“आपल्या सभेमध्ये जाहीर तुम्हाला वचन देते, धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्तापरिवर्तन न करता, सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीला आणायचं आहे. मी जोपर्यंत तुमच्या आरक्षणाचा विषय होणार नाही, मंत्रालयाच्या दालनात मी प्रवेश करणार नाही. तुमच्याबरोबर दिल्लीला नाही, पृथ्वीच्या बाहेर कुठे जायची वेळ आली तरी तुमच्या बरोबर मी येईन. तुम्ही म्हणलात ताई या राजकारणात काही खरं नाही, मेंढरामागे चला, तर मी मेंढरामागे येईन”
धनगर आरक्षण आणि मंत्रालय प्रवेशबाबात पंकजा मुंडे यांचं वक्तव्य जसंच्या तसं @Pankajamunde pic.twitter.com/s7cbl8K7KX
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 8, 2019
“आम्ही परत सत्ता पादाक्रांत करणार आहोत. तुमच्या आशीर्वादाने करणार आहोत. मला माहित नाही इथे बसलेले लोक काय करतील. पण मला विश्वास आहे, धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही परत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही.”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
VIDEO : नांदेड : धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही पुन्हा मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही : पंकजा मुंडे @Pankajamunde pic.twitter.com/WRbyyQd6sK
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2019
… तर मला खुशाल रोखा, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
‘आम्ही पुन्हा सत्ता प्रस्थापित करणार आहोत, पण त्या सत्तेत विराजमान होत असताना धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही’ या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. आमदार रामराव वडकुते यांनी मला रोखण्यापेक्षा गेल्या 70 वर्षात जे धनगरांना आरक्षण देऊ शकले नाहीत त्यांना रोखावं. ते ज्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी धनगरांना आरक्षण का दिले नाही. जर मला रोखल्याने धनगर आरक्षण मिळणार असेल तर मला खुशाल रोखा”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
धनगर समाजाला आरक्षण दिल्या शिवाय आम्हाला पुन्हा सत्तेत येता येणार नाहीत… मंत्रालयाची पायरी चढता येणार नाही असं वक्तव्य मी केलेलं नाही.. पायरी चढणार नाही असं वक्तव्य नव्हतं…
कोण आहेत रामराव वडकुते?
रामराव वडकुते हे विधानपरिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत
धनगर समाजाचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे
धनगर आरक्षणासाठी त्यांनीही आवाज उठवला आहे.
रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवलं आहे.
परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले
माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर त्यांनी धनगर समाजाच्या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले.
2002 मध्ये राष्ट्रवादीने वडकुते यांची महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीच्या काळातच त्यांनी महामंडळास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वडकुते यांचे गाव आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हा हे कार्यक्षेत्र राहिलं.
2004 मध्ये वडकुते यांना राष्ट्रवादीने विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत वडकुते यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव सातव यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने ही जागा स्वत;कडे घेतली.
त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली.