राज ठाकरे मैदानात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भेटीची वेळ ठरली
या भेटीचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झाला नसला तरी लोकहिताच्या प्रश्नांवर दाद मागण्यासाठी राज ठाकरे हे राज्यपालांना भेटणार असल्याचे समजते. | Raj Thackeray
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झाला नसला तरी लोकहिताच्या प्रश्नांवर दाद मागण्यासाठी राज ठाकरे हे राज्यपालांना भेटणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच पत्र लिहून राज्यपालांवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या राज्यपाल भेटीच्या टायमिंगची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (MNS chief Raj Thackeray will meet Governor Bhagat Singh Kohsyri )
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध संघटना, कर्मचारी आणि नागरिकांची शिष्टमंडळे सातत्याने कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेताना दिसत होती. यापैकी काही प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा करुन सोडवले होते. तर काही समस्यांसाठी राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आता राज ठाकरे थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्यातील मंदिरे उघडण्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. तसेच तुम्ही आता ‘सेक्युलर’ झालात का, अशी टिप्पणीही केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना अत्यंत संयत पण परखड भाषेत प्रत्युत्तर दिले होते. या भाषाप्रयोगामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. यानंतर आजच शरद पवार यांनीही राजभवनाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या कॉफी टेबल पुस्तकावरुन राज्यपालांना खरमरीत पत्र लिहले होते. या सगळ्यामुळे सध्या राजभवनाविषयी जनसामान्यांमध्ये काहीशी नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरेंना लिहलेल्या ‘त्या’ पत्रात राज्यपालांनी काही शब्द टाळायला पाहिजे होते- अमित शाह
राज्यपालांना पॉलिटिकल एजंटसारखे वापरणे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नव्हे; राऊतांचा भाजपला टोला
(MNS chief Raj Thackeray will meet Governor Bhagat Singh Kohsyri )