विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्या रुपाली पाटील यांना विधानसभेला दिलेला शब्द पाळला आहे.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्या रुपाली पाटील यांना विधानसभेला दिलेला शब्द पाळला आहे. राज ठाकरे यांनी मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून अॅ.ड रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (MNS Gave ticket Rupali Patil Pune Graduate Constituency)
राजकीय पक्षाकडून जाहीर करण्यात आलेली ही पहिलीच उमेदवारी आहे. खुद्द राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. रुपाली पाटील या पक्ष स्थापनेपासून (14 वर्षांपासून) मनसेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या निष्ठेचं आणि कामाचं फळ त्यांना मिळालं आहे.
पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून रुपाली पाटील यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे.
त्या उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम LLB झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शुटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत. पदवीधर, युवक-युवतींचे रोजगाराचे तीव्र झालेले प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे रुपाली पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर टीव्ही 9 शी बोलताना सांगितले.
2019 च्या विधानसभेला तिकीट न मिळाल्याने रुपाली पाटील नाराजी
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास रुपाली पाटील इच्छुक होत्या. मात्र या ठिकाणी मनसेने अजय शिंदे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे रुपाली पाटील नाराज झाल्या होत्या. मात्र पक्षाचा आदेश अंतिम मानून त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजय शिंदे यांचा जोरदार प्रचार केला.
पुण्यातील मनसेचा आक्रमक आवाज
पुणे शहरातील मनसेचा आक्रमक आवाज म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या सातत्याने भांडत असतात. कोव्हिड काळात देखील अनेक रुग्णालयांना भेटी देऊन तेथील गैरप्रकार त्यांनी उघडे पाडले होते. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्या सासत्याने भूमिका घेत असतात.
संबंधित बातम्या
मनसेच्या ‘डॅशिंग’ नेत्या रुपाली पाटील उमेदवारी डावलल्याने आक्रमक