आगामी निवडणुकांआधी मनसेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश!
सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांची फळी आपली सूत्र हालवत नाराज उमेदवारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रणनीती आखत आहेत. मात्र अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे.
चंद्रपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसत आहे. पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेशही पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांची फळी आपली सूत्र हालवत नाराज उमेदवारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रणनीती आखत आहेत. मात्र अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे.
वरोरा विधानसभा क्षेत्रात मनसेच्या तिकिटावर 2019 ची निवडणूक लढलेले रमेश राजूरकर यांना भाजपच्यावतीने विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 13 जूनला रोजी राजूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या विधानसभा प्रमुखांच्या यादीत रमेश राजुरकर यांचे नाव आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रमेश राजूरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बदललेली राजकीय समीकरणे बघता भाजपने नवा डाव टाकल्याचे चित्र दिसत आहे. याच क्षेत्रातून दिवंगत खासदार यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आमदार आहेत.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा तयारीला लागले आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल तस तसा सभांवर सभा होणार, सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात यंदा राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आपल्या ठाकरी बाण्याने आगामी निवडणूकांसाठी मूठ कशी बांधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी घेतली वसंत मोरेंची भेट
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली मनसे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली आहे. अमोल कोल्हे आज पुण्यातील शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी कात्रज भागात असताना त्यांनी वसंत मोरे यांच्या निवस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. अमोल कोल्हे यांच्यासोबत आमदार चेतन तुपे हे देखील उपस्थित होते.