BREAKING – राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याला रवाना, चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर तातडीने दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुण्याला जाणार आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. राज ठाकरे हे गेल्या महिन्यात आठ दिवसांच्या फरकाने दोन वेळा पुण्याला गेले होते.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune) हे आज पुण्याला जाणार आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. राज ठाकरे हे गेल्या महिन्यात आठ दिवसांच्या फरकाने दोन वेळा पुण्याला गेले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्याशीही ते पुण्यात चर्चा करणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता राज ठाकरे संवाद साधणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती. या भेटीनंतर तातडीने राज ठाकरे पुण्याला रवाना झाले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सविस्तर वृत्तांत मीडियाला सांगितला. ही केवळ सदिच्छा भेट होती, यामध्ये अर्थातच राजकीय चर्चा झाली. पण भाजप आणि मनसे युतीबाबत असा कोणताही प्रस्ताव सध्यातरी नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती दिल्याने मनसे-भाजप युतीच्या चर्चांना बळ आलं आहे.
राज ठाकरेंचा पुणे दौरा
ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे 27 जुलैला पुण्यात दाखल झाले होते. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्याआधीच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune) हे 19,20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली होती. त्यानंतर आता राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर गेले आहेत.
नाशिकनंतर पुण्याच्या मैदानात
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा केला होता.
मनसे शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफर
दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.
45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा
दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.
पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप – 99 राष्ट्रवादी – 42 काँग्रेस – 10 सेना – 10 मनसे – 2 एमआयएम – 1 एकूण जागा – 164
संबंधित बातम्या
VIDEO | अहो आश्चर्यम! बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत राज ठाकरे चक्क मास्कमध्ये
बॅग भरुन कपडे आणा, राज ठाकरेंचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश, ठाण्यावरुन आजच पुण्याला निघणार