Yogesh Khaire | उद्धव साहेब, हे घ्या हिंदुत्व सोडल्याचे दाखले, मनसे प्रवक्ते योगेश खैरेंचे शिवसेनाप्रमुखांवर टीकास्त्र
हिंदुत्वाच्या विचारसरणीशी उद्धव ठाकरे प्रामाणिक होते तर गेल्या काही वर्षांत काही मुद्द्यांवर त्यांनी घेतलेली भूमिका एवढी विरोधाभासी का आहे, असा सवाल योगेश खैरे यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या काही भूमिकांचे दाखलेही दिले आहेत.
बईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली असा आरोप मनसेकडून वारंवार केला जातोय. शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राला उद्धव ठाकरे यांनी जाहीर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीद्वारे उद्धव ठाकरे शिवसेना, हिंदुत्व (Hindutwa) आणि इतर पक्षांसोबत असलेल्या संबंधांवर अधिक स्पष्टपणे प्रकाशझोत टाकत आहेत. आज या मुलाखतीचा काही अंश प्रकाशित झाला. त्यावरून हिंदुत्व आणि शिवसेनेचे किती घट्ट नाते आहे, हे सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना यावर उलट प्रश्न विचारले आहेत. हिंदुत्वाच्या विचारसरणीशी उद्धव ठाकरे प्रामाणिक होते तर गेल्या काही वर्षांत काही मुद्द्यांवर त्यांनी घेतलेली भूमिका एवढी विरोधाभासी का आहे, असा सवाल योगेश खैरे यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या काही भूमिकांचे दाखलेही दिले आहेत.
योगेश खैरेंनी दिलेले दाखले कोणते?
मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी उद्धव ठाकरेंना पाच दाखले देऊन त्यावर सवाल उपस्थित केले आहेत. ते म्हणाले..
- आम्ही धर्म आणि राजकारण मिसळलं ही आमची चूक होती असं विधानसभेत म्हणाले. मग दोन चार मतांसाठी एमआयएम सपासोबत हातमिळवणी केली का केली?
- औरंगाबाचं नामांतर करण्यात सतत टाळाटाळ का करत होता?
- मस्जिदवरील भोंगे काढा सांगितलं, हनुमान चालीसा म्हटली म्हणून गुन्हे दाखल का केले?
- मा. बाळासाहेबांचा उल्लेख ‘जनाब’ म्हणून केला. उर्दू भाषा भवनाला निधीची खैरात का केली?
- मा. बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत मुख्यमंत्री पदासाठी युती केली.
कार्टूनद्वारे टीका
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शिवसेनेची भूमिका विविध माध्यमांद्वारे प्रभावीपणे मांडत आहेत. खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेदेखील ठिकठिकाणी शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. मात्र मनसे तसेच भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर टीका करणे सुरुच आहे. मनसेतर्फे एका कार्टूनच्या माध्यमातून खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘साहेब’ बोले तैसा चाले म्हणून त्यांचे अस्तित्व बुडाले, असा आशय त्यावर लिहिला आहे.
– आम्ही धर्म आणि राजकारण मिसळलं ही आमची चूक होती असं विधानसभेत म्हणाले. – दोन चार मतांसाठी एमआयएम सपासोबत हातमिळवणी केली. – औरंगाबाचं नामांतर करण्यात सतत टाळाटाळ केली. – मस्जिदवरील भोंगे काढा सांगितलं, हनुमान चालीसा म्हटली म्हणून गुन्हे दाखल केले.
— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) July 26, 2022
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अर्थात शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून यापुढे मतांची भीक मागू नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून दिला. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली. 2019 साली शिवसेना-भाजप युती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर्स लावूनच निवडणुका जिंकल्या. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा तुमचे बाप होते का, असा सणसणीत सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.