सर्वात मोठी बातमी ! मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?
मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला असल्याचं सांगितलं जात आहे.

अभिजीत पोटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपशी केलेली हातमिळवणी, वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाशी केलेली युती आणि आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून युतीत केलेला प्रवेश यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे.
मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय वर्तुळातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून राज्यात आणखी नवीन राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.




टू प्लस टू फोर करू नका
माझं वैयक्तिक काम होतं म्हणून मी भेटलो. युतीचा प्रस्ताव घेऊन यायला मी एवढ्या मोठ्या पदावर नाही. मी राज ठाकरे यांचा कट्टर सैनिक आहे. या सर्व विषयांवर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच उत्तर देतील. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो आहे. त्याचं टू प्लस टू फोर करू नका, असं अभिजीत पानसे म्हणाले.
राजकीय चर्चा नाही
राजकीय चर्चेचा संबंध नाही. संजय राऊत यांच्याशी माझे जुने संबंध आहेत. सत्याचा राजकीय अर्थ काढू नये. मी काही प्रस्ताव घेऊन आलेलो नाही. मला संजय राऊत यांनीच राजकारणात आणलं होतं. मला पर्सनल गोष्टीसाठी भेटायचं होतं. माझं काही काम होतं. बरेच दिवस त्यांना भेटलो नव्हतो. मी त्यांच्या घरीच जाणार होतो. पण ते सामनात असल्याचं कळलं म्हणून सामनात आलो,असंही ते म्हणाले.
राज यांच्या पाठी उभे राहा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का? या प्रश्नावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. माझ्या वाटण्यावर काही होत नाही. राज ठाकरे यांनी आधीच काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांना युती आणि आघाड्यात रस नाही. राजकारणात जे काही चाललं आहे, मतदान कुणाला केलं आणि कोण राज्यात आलं. राज ठाकरे महाराष्ट्राचं भविष्य आहे आणि या क्षणाला महाराष्ट्राने राज ठाकरे यांच्या पाठी उभं राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.