छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार, तारीख ठरली
खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले येत्या 2 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. (MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale Meet CM Uddhav Thackeray)
मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले येत्या 2 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित असणार आहेत. (MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale Meet CM Uddhav Thackeray)
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी 2 डिसेंबरला खासदार संभाजीराजे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. ही भेट नेमकी कुठे होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली आहे. मात्र या बैठकीत मराठा आरक्षणाचे मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित असतील.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयात स्थगिती
सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात येणार नाहीत. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत, अशा SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाच्या अधीन असेल, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं एसईबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली असून, 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या कार्यवाहीबाबत महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला कायदेशीर अभिप्राय विचारात घेतल्यानंतर सर्व प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ही ठाकरे सरकारनं स्पष्ट केले होतं. (MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale Meet CM Uddhav Thackeray)
संबंधित बातम्या :
मराठा आरक्षण समितीवरून चव्हाणांना हटवून एकनाथ शिंदेंना अध्यक्ष करा; नरेंद्र पाटील यांची मागणी
मराठा आरक्षणावर आता तुम्हीच मार्ग काढा; मराठा आंदोलक शरद पवारांना भेटणार