Nitin Desai : तीन दिवसांआधीच एका प्रोजेक्ट संदर्भात बोलणं झालं, भेटायचं ठरलं अन् आज…; मनसे नेत्याकडून हळहळ व्यक्त
Nitin Desai Death Case : नितीन देसाई यांच्या जाण्याचं दुःख कधीही भरून काढता येणार नाही; मनसे नेत्याकडून भावनांना वाट
मुंबई | 02 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. कर्जतच्या एन डी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांच्या अकाली जाण्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळातूनही नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. शिवाय आठवणींनाही उजाळा दिला जात आहे. मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी तीन दिवसांआधी देसाई यांच्याशी बोलणं झाल्याचं म्हटलं आहे.
अभिजित पानसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना नितीन देसाई यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
नितीन देसाई हे कला दिग्दर्शनातील मोठं नाव होतं. त्यांची कलाकृती म्हणजे भव्यदिव्यतेचं आणि नाविन्याचं उत्तम उदाहरण होतं.नितीन देसाई यांचं जाणं अतिशय वेदनादायी आहे. हे दुःख कधीही भरून निघणार नाही, असं पानसे म्हणालेत.
नितीन देसाई आणि माझं संवाद तीन दिवसापूर्वीच बोलणं झालेलं. नवीन प्रोजेक्टबद्दल आम्ही दोघं बोलत होतो. मी नव्याने सुरु केलेली इन्स्टिटयूटबद्दलही आम्ही सविस्तर बोललो. लवकरच भेटलं पाहिजे, असं आम्ही म्हणालो. मुंबईला भेटायचं की पुण्याला यावरही आम्ही चर्चा केली, असं पानसे यांनी सांगितलं.
तीन दिवसांआधी बोलणं झालं भेट ठरली पण आज अचानकपणे दुर्दैवी घटना समोर आली. हे ऐकून मनाला वेदना झाल्या, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
नितीन देसाई यांचं हे असं अकाली जाणं, ही खूप मोठी शोकांतिका आहे. नितीन देसाई हे फक्त चित्रपटांपुरते मर्यादित नव्हते. तर त्यांना अनेक राजकीय सभांसाठी देखील सेट उभारले. मोठमोठ्या सभांचा सेट ते ठरवायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधील सभा, शिवाजी पार्कमधील सभा, त्यांच्या शपथविधीच्यावेळीही नितीन देसाई यांनीच सेट उभारला होता, असं अभिजीत पानसे यांनी सांगितला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं आहे. त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणालेत.
ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस… pic.twitter.com/tJjqeXeH4q
— Raj Thackeray (@RajThackeray) August 2, 2023