2022 ला संधी होती, ती घेतली असती तर आज राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता-अजित पवार
Ajit Pawar on Maharashtra CM : मी पवारसाहेबांच्याच नेतृत्वात तयार झालोय; अजित पवारांनी राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकला
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बोलताना मोठे गौप्यस्फोट केल आहे. 2022 ला संधी होती, ती घेतली असती तर आज राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता, असं अजित पवार म्हणालेत. अजित पवार यांनी यावेळीअनेक गौप्यस्फोट केले. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवरही प्रकाश टाकला. तसंच 2017 साली देखील राज्यात वेगळं समीकरण समोर येणार होतं, असंही अजित पवार म्हणाले.
आज बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री होण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. मला मनापासून वाटतं की मुख्यमंत्री व्हावं, असं अजित पवार म्हणाले आहेत.
मी जातीपातीचं नात्यागोत्याचं काम केलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करतो. पहाटे कामाला सुरुवात करतो. आजही करतो. महाराष्ट्र पुढे जावं म्हणून हे करत असतो. देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून मी काम करत असतो, असंही अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीवर ही वेळ का आली. मी राजकीय जीवनात काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो आहे. घडलो आहे. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. साहेब श्रद्धास्थान आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या. देश पातळीवर आणि राज्य पातळीवर वेगळं राजकारण सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.
एखादा पक्ष कशासाठी स्थापन करत असतो. लोकांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी. संविधानाचा आदर करण्यासाठी. सर्व समाज असेल त्यांच्या विकासासाठी आपण काम करत असतो. सर्व लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावं. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं असतं त्यासाठी आपण काम करत असतो, असं अजित पवार म्हणाले.
१९६२मध्ये आपल्या वरिष्ठ नेत्यांनी कामला सुरू केली. ६७ला उमेदवारी मिळाली. ७२ राज्य मंत्री झाले. ७५ला कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर असाच प्रसंग उद्भवला आपल्या वरिष्ठ नेत्याने वसंतदादांचं सरकार बाजूला करून मुख्यमंत्री झाले. ते ३८ वर्षाचे होते. तेव्हापासून राज्यातील जनतेने त्यांना साथ दिली. त्यानंतर पुलोद आलं. त्यात हशू आडवाणी वगैरे होते. ८०ला सरकार गेलं. तेव्हाही इंदिराजी म्हणाल्या, तुम्ही काँग्रेसमध्ये आला तर सरकारमध्ये आला तर सरकार ठेवते. नाही म्हणून सांगितलं. ८०ला निवडणुका झाली. इंदिराजींची लाट आली. त्या पंतप्रधान झाल्या, असं अजित पवारांनी सांगितलं.
समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली. ही ८६ची गोष्ट. का झाली माहीत नाही. दोन वर्ष नेत्यांना पद दिलं नाही. राजीव गांधी यांनी नंतर मुख्यमंत्रीपद दिलं. ९०ला निवडणुका झाल्या. बहुमत मिळालं नाही. अपक्षांनी साथ दिली. त्यानंतर राजीव गांधी आपल्यातून निघून गेले,. त्यानंतर लाट आली. नरसिंहराव पंतप्रधान झाले., त्यानंतर नरसिंहराव यांनी केंद्रात बोलावलं. साहेब केंद्रात गेले. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यानंतर साहेबांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं, असं म्हणत अजित पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.