‘फडणवीस हे कुटुंबप्रमुख, दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी’, नाराजीच्या चर्चेनंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया
मुंबई बँक अध्यक्षपद निवडणुकीत प्रसाद लाड यांचा पराभव झाला. त्यांनंतर प्रसाद लाड यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्याबाबत विचारलं असता 'देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊ शकत नाही', अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिलीय.
मुंबई : मुंबई मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँक (Mumbai Bank) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेळीमुळे मुंबै बँकेवरील प्रवीण दरेकरांचं (Pravin Darekar) वर्चस्व संपुष्टात आलं. तर अध्यक्षपद निवडणुकीत प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा पराभव झाला. त्यांनंतर प्रसाद लाड यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्याबाबत विचारलं असता ‘देवेंद्र फडणवीस हे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नाराज होऊ शकत नाही’, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिलीय.
प्रवीण दरेकर आणि मी संताजी, धनाजीची जोडी महाराष्ट्राला मिळाली आहे. सरकारही या जोडीला घाबरतं. सरकारही आम्ही काय रिअॅक्शन करु याला घाबरतं. दरेकर यांच्यावर नाराजीचा प्रश्नच येत नाही. कालच्या निवडणुकीत गद्दारी ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि महाविकास आघाडीनं केली आहे, असा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय. मुंबई बँक निवडणूक दरेकर यांच्या नेतृत्वाखाली लढले आणि त्यांचा घात केला. घात करुन निवडणूक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, असंही लाड म्हणाले.
‘राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला’
तसंच आमची मतं फुटली नाहीत. मत फुटलं ते शिवसेनेचं त्यामुळेच आमचा उपाध्यक्ष झाला. मजूर गटातील दरेकर यांचं मत बाद झालं. त्यामुळे आमचा आकडा 11 वरुन 10 वर आला. एक अपक्ष होता, तो कुठेही मतदान करु शकत होता. यात भाजप आणि महाविकास आघाडी असा मुद्दा कुठेही नव्हता. आमची ताकद बघा. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि दस्तुरखुद्द शरद पवार यांनी प्रयत्न केले. पण महाविकास आघाडीनं पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आणि शिवसेनेच्या पाठीत राष्ट्रवादीने खंजीर खुपसला, असा गंभीर आरोप लाड यांनी केला आहे.
‘मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सल्लागारांकडून चुकीचं मार्गदर्शन’
प्रसाद लाड यांनी पंतप्रधान मोदींच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुनही जोरदार टीका केली. देशाचे पंतप्रधान राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतात, तेव्हा ते भाजपचे नेतृत्व म्हणून नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून बैठक घेतात. कोरोनाचा प्रश्न गंभीर आहे. असं असताना मुख्यमंत्री त्या बैठकीला अनुपस्थित राहतात, त्यामुळे मुख्यमंत्री किती गंभीर आहेत हे लक्षात येतं आणि मुख्यमंत्री दोन वर्षात किती गंभीर होते हे ही यावरुन स्पष्ट होतं. त्यांना महापालिका पंतप्रधानांपेक्षा मोठी वाटत आहे. त्यांचे सल्लागार चुकीचं मार्गदर्शन करत आहेत, असा टोलाही प्रसाद लाड यांनी लगावला आहे.
इतर बातम्या :