Mahayuti : ‘बापाच्या 2 नंबरच्या पैशावर आम्ही….’, मुंबईत महायुतीमधील मतभेद उघड, भाजपा नेत्याचा इशारा
Mahayuti : प्रभादेवीत राहुल शेवाळे यांच्या प्रचारादरम्यान महायुतीमधील हे मतभेद समोर आले. भाजपाच्या महिला नेत्याने थेट इशारा दिला. महायुतीचे नेते आपसात कुठलेही मतभेद नसल्याच सांगत आहेत. पण दक्षिण मध्य मुंबईतील एका रॅलीत समोर आलेलं चित्र वेगळं आहे.
देशात NDA विरुद्ध INDIA तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महाविकास आघाडीने बहुतांश जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पण महायुतीकडून अजूनही काही जागांवर उमेदवारांची नाव जाहीर होत नाहीयत. महायुतीचे नेते आपसात कुठलेही मतभेद नसल्याच सांगत आहेत. पण दक्षिण मध्य मुंबईतील एका रॅलीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद समोर आले आहेत. भाजपाच्या महिला नेत्याने शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला आहे. ‘युती धर्म फक्त भाजपा पाळणार या गैरसमजात राहू नका’ असं म्हटलय.
मुंबईतील काही जागांवर अजून उमेदवार जाहीर झालेले नाहीत. पण काही जागांवर उमेदवारांची घोषणा झालेली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे मैदानात आहेत. महायुतीने त्यांना उमेदवारी दिली आहे. सध्या दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी सुरु आहेत. या दरम्यान प्रभादेवी येथील रॅलीत सदा सरवणकर आणि अक्षता तेंडुलकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर अक्षता तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. काहीवेळाने ही पोस्ट डिलीट करण्यात आली.
‘आमच्या नादी लागलात, तर आ रे ला का रे करणार’
भाजपा नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला. अक्षता तेंडुलकर शिंदे गटाच्या नेत्यावर टीका केली. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रिया सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्यावर टीका केली. “हिंदुत्व, मोदीजींसाठी आम्ही काम करतो. बापाच्या २ नंबरच्या पैशावर, पदावर आम्ही नाही उडतं. युती धर्म फक्त भाजपा पाळणार या गैरसमजात राहू नका. आमच्या नादी लागलात तर आ रे ला का रे करणार” असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.