मुंबई महापालिकेत भाजपला मोठा झटका, विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच
मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीच्या विरोध पक्षनेतेपदाची मागणी करणारी याचिका फेटाळत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब केलाय (High Court on opposition leadership of BMC).
मुंबई : भाजपला मुंबई महानगरपालिकेत मोठा झटका बसला आहे. शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर सत्तेतून बाहेर आलेल्या भाजपच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपदही मिळालेलं नाही. याविरोधात भाजपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब केला आहे (High Court on opposition leadership of BMC). त्यामुळे बीएमसीत भाजपची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ता काळात मित्र पक्ष असलेल्या भाजपने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर पालिकेत विरोधाची भूमिका घेतली. भाजपने विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला. मात्र, महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचा हा दावा फेटाळला होता. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा दावा फेटाळला. याचविरोधात भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, येथेही भाजपच्या हाती निराशाच आली आहे.
दरम्यान, भाजपकडून नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी आणि गटनेतेपदासाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र महापौर पेडणेकर यांनी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता नेमला. त्यामुळे दुसरा विरोधी पक्षनेता नेमता येणार नाही असे सांगत त्यांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदावरील दावा फेटाळला. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी मोठा गोंधळही घातला होता. नंतर याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं.
पालिकेच्या नियमाप्रमाणे काँग्रेसला देण्यात आलेले विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडेच राहणार की भाजपकडे जाणार याबाबतचा निकाल न्यायालय देणार असल्याने राजकीय पक्षांच्या नजरा उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागल्या होत्या. आज भाजपचा दावा फेटाळत मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहणार यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केला.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर महापालिकेत भाजपने मोठे फेरबदल केले आहेत. आतापर्यंत पहारेकऱ्यांच्या भुमिकेत असणाऱ्या भाजपनं विरोधी पक्षनेतेपदावरही दावा केला होता. भाजपने आपला महापौर बसवण्याचा निर्धार केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्या नियुक्ती केल्या आहेत. खासदार झालेल्या मनोज कोटकांच्या जागी गटनेता म्हणून विनोद मिश्रा यांची नेमणूक केली. त्यामुळे नव्या फेरबदलांसह भाजपची तोफ महापालिकेत धडाडताना दिसत आहे.
भाजपनं 2017 च्या महापलिका निवडणुकांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही त्यावेळी विरोधी पक्षात बसणं टाळलं. त्यावेळी राज्यात भाजप-सेनेच्या युतीची सत्ता होती. मात्र ज्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी महापालिकेत भाजपनं शिवसेनेच्या विरोधात जाण्याच टाळलं, त्याच विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं. त्यामुळे आता बदललेल्या गणितांसोबत भाजपची भुमिकाही बदलणार आहे.
गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी झाली नव्हती. शिवसेनेला मुंबई महापौर पदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपने शिवसेनेला मदत केली (Mumbai BMC 2022 Election) होती.
मुंबई महापालिका संख्याबळ
शिवसेना – 96 भाजप – 82 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी काँग्रेस – 8 समाजवादी पार्टी – 6 एमआयएम – 2 मनसे – 1 अभासे – 1
संबंधित बातम्या :
मुंबई महापालिकेत भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा, नव्या फेरबदलासह भाजपची सेनेला टक्कर
मुंबईच्या महापौरांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा फेटाळला
संबंधित व्हिडीओ :
High Court on opposition leadership of BMC