लोकसभेसाठी महायुतीची ‘महारणनिती’; तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मेगाप्लॅन सांगितला…
Mumbai Mahayuti Press conference : देशात यंदा सार्वत्रित निवडणूक होणार आहे. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यात महायुतीची 'महारणनिती'वर भाष्य करण्यात आलं. वाचा...
मुंबई | 03 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच महायुतीच्या वतीने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीसाठीचा प्लॅन सांगितला आहे. भाजचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकांबाबतच्या महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. सुरुवातीला सुनील तटकरे यांनी आपली भूमिका मांडली. हे वर्ष आपणा सर्वांसाठीच महत्वाचं आहे. या वर्षी लोकसभेची निवडणूक होत आहे, असं म्हणत सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली.
महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे होणार
महायुती म्हणून येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी केला आहे. गेली 10 वर्षे नरेंद्र मोदी हे देशासह जगभरात देशाची प्रतिमा उंचावत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो आहोत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमचं महायुतीचं सरकार काम करतंय. अशातच निवडणुका लक्षात घेता जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्याजिल्ह्यात महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. 14 जानेवारीला एकाच दिवशी सगळ्या जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेतले जाणार आहेत. किमान एक हजार कार्यकर्ते या शिबिरात सहभागी होण्याची शक्यता आहे. पण लोकांचा उत्साह पाहता जास्त लोक इथं येऊ शकतात, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.
दादा भुसे यांनी शिवसेनेची भूमिका मांडली
शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनीही आपली भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात अनेक चांगले निर्णय घेतले गेले. तसंच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. ही कामं लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही जिल्हा पातळीवर मेळावे घेत आहोत. आगामी निवडणूक आम्ही एकत्र लढू, असं दादा भुसे म्हणाले.
बावनकुळे काय म्हणाले?
भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका मांडली. येत्या काळात आम्ही ताकदीने लढू. राज्यात 45 हून अधिक जागा जिंकू, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. मराठा समाज असेल. 12 बलुतेदार असतील. ओबीसी बांधव असतील, असा संपूर्ण महाराष्ट्र महायुतीच्या पाठिशी आहे. आम्ही जिंकू याचा विश्वास आहे, असंही ते म्हणाले.