साहेब आमच्या सगळ्यांचे राजीनामे घ्या, पण अध्यक्षपद सोडू नका; जयंत पाटील यांच्या डोळ्यात पाणी
Jayant Patil on Sharad Pawar : साहेब आमच्या सगळ्यांचे राजीनामे घ्या, हवं दुसरे लोक पक्षात घ्या, पण अध्यक्षपद सोडू नका- जयंत पाटील
मुंबई : “पवारसाहेब, तुम्ही कुणालाही कल्पना न देता निवृत्तीची घोषणा केली. असा निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. साहेब हवं तर आमच्या सगळ्यांचे राजीनामे घ्या. हवं पक्षात दुसरे लोक घ्या, पण अध्यक्षपद सोडू नका”, अशी विनंती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांनी केली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार होण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेत्यांनी त्यांना विनंती केली आहे. जयंत पाटील यांनीही राजीनामा मागे घेण्याती शरद पवार यांना विनंती केली. यावेळी जयंत पाटील भावूक झाले.
जयंत पाटील यांच्या डोळ्यात पाणी
शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली. यावेळी जयंत पाटील शरद पवार यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. हुंदके देत त्यांनी शरद पवार यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली.
जितेंद्र आव्हाड भावूक
जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. शरद पवारसाहेब तुम्ही आमचे नेते आहात. देशातलं सध्याचं वातावरण पाहता तुम्ही पक्षात अध्यक्षपदावर सक्रीय असणं गरजेचं आहे. त्यामुळे साहेब तुम्ही निर्णय मागे घ्या, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
जयंत पाटील यांच्यासोबतच जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, फौजिया खान यांच्यासह अन्य नेत्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
भाकरी फिरवण्याचं विधान
शरद पवार यांनी काही दिवसांआधी भाकरी फिरवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. पक्षात आता भाकरी फिरवण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पाय उतार होण्याची घोषणा केली आहे.
संजय राऊत यांचं ट्विट
संजय राऊत यांनी ट्विट करत या सगळ्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत, असं ट्विट राऊतांनी केलं आहे.