परदेशात देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून? उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल
Opposition Alliance India | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या आघाडी असलेल्या 'इंडिया' या नावावरुन टीका केली होती.
मुंबई | “इंडिया, भारत, भारतमाता ही देशाची नावं आहेत. मला मोदी यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही परदेशात जाता, बायडनला मिठी मारता, यांना मिठी मारता, त्यांच्याशी हस्तांदोलन करता. बाजूला उभे राहता, आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. पण तेव्हा तुमची ओळख ही प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अशी केली जाते. तेव्हा तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता?”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात शिवसेना ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी करकारला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. जवळपास 20 पेक्षा अधिक पक्ष हे एकत्र आलेत. काही दिवसांपूर्वी या विरोधकांच्या आघाडीची बैठक पार पडली. विरोधकांच्या आघाडीचं ‘इंडिया’, असं नामकरण करण्यात आलं. या इंडिया नावावरुन मोदींनी टीका केली होती.
नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?
“ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिद्दीन यांच्या नावातही इंडिया होतं, असं म्हणत पीएम मोदी यांनी विरोधकांवर घणाघात चढवला होता. भाजपची संसदीय पक्षाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मोदींनी ही टीका केली होती.
“यूपीए हे नाव बदनाम झालं आहे. त्यामुळे आता विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया नाव दिलं आहे. मात्र, विरोधकांची ही आघाडी इंडिया नाही तर घमंडीया आहे.”, अशी टीकाही मोदींनी काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्तुतर देत मोदींवर घणाघात केला.
“भाजपात राम राहिला नाही”
भाजपात राम राहिला नाही, आहेत ते सर्व आयाराम आहेत”, अशा शब्दात उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच “आमच्या हृदयातला राम तुम्ही काढू शकत नाही. तुमचा आयारामांचा पक्ष झाला आहे. राम मंदिर बांधा, पण तुम्ही आयारामांचं मंदिर बांधलं आहे, त्याचं काय”, असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.