पोपट, मेलेला पोपट अन् आरोप प्रत्यारोप; राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय काय? पाहा…
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात 'पोपटा'ची एन्ट्री; नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध विषय चर्चेत असतात. आता एका नव्या मुद्द्याने एन्ट्री केली आहे. ती म्हणजे पोपट… पोपट हा शब्द मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, भाजपचे नेते नितेश राणे यांनी या मुद्द्यावर भाष्य केलंय.
16 आमदारांच्या अपात्रतेवरून फडणवीस आणि ठाकरे गटात वार-पलटवार सुरू आहे. याच अनुषंगाने पोपट हा शब्द वापरला जात आहे.
मेलेला पोपट जाहीर विधानसभा अध्यक्षांवर-उद्धव ठाकरे
सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर फटाके वगैरे फोडण्याचं कारण अद्याप कळलेलं नाहीये. असं म्हणतात की त्यांना रेडा वगैरे या गोष्टी चांगल्या माहिती आहेत. असं मी ऐकलंय मी काही पाहिलेलं नाहीये. रेड्याला हारतुरे घातले जातात. त्यांनी फटाके वाजवले असतील तर माहिती नाहीये.सर्वोच्च न्यायालयाने पोपट हलत नाही, निश्चल आहे. त्याने डोळे मिटलेले आहेत. चोच उघडत नाही. श्वासही घेत नाहीये. हे वर्णन करून पोपट मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम विधानसभा अध्यक्षांवर सोपवलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलेलं आहे. त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय देतली. एक अभ्यासक म्हणून एक वकील म्हणून आणि 25 वर्षे विधानसभेचा सदस्य म्हणून मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला पुरतं माहिती आहे की, पोपट मेला आहे. तरी देखील ते पोपटावर बोलतायेत. मान हलवत नाहीये, वगैरे म्हणतात. पण आपल्या पक्षातील नेत्यांना खूश ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे बोलतात. तो त्यांचा अधिकार आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांचं भाष्य
सर्वोच्च न्यायालयाने घडलेल्या प्रकारावर भाष्य केलेलं आहे. शिंदे सरकारचा पोपट मेला आहे. ते केवळ जाहीर करणं बाकी आहे. मला असं वाटलेलं या शिंदे सरकारमध्ये एकमेव शहाणा माणूस आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. पण फडणवीसच असं बोलायला लागले असतील तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील, असं संजय राऊत म्हणालेत.
नारायण राणे यांची राऊतांवर टीका
संजय राऊत याला काम धंदा नाही. पोपट मातोश्रीत होता तोवर ठीक होता. आता मुख्यमंत्री झाल्यावर लगेच यांना अस म्हणू नये. राऊत ठाकरे डिप्रेशनमध्ये आहेत, असं नारायण राणे म्हणालेत.
नितेश राणे म्हणाले…
नितेश राणे यांनीही या पोपटाच्या विषयावर भाष्य केलंय. मातोश्रीचा पोपट मेलेला आहे हे आमचे अध्यक्ष लवकरच जाहीर करतील, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.