संजय शिरसाट तुम्हाला मंत्रिपद मिळणार की नाही याकडं लक्ष द्या, उगीच…; रोहित पवार यांनी सुनावलं
Rohit Pawar on Sanjay Shirsat : संजय शिरसाट तुम्हाला मंत्रिपद मिळणार की नाही याकडं लक्ष द्या, उगीच...; रोहित पवार यांनी सुनावलं
मुंबई | 24 जुलै 2023 : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडलेला आहे. शिवसेना आणि भाजपचे अनेक नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी होल्डवर ठेवण्यात आलं आहे. अशातच जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना सुनावलं आहे. तसंच समोर येऊन बोलण्याचं आव्हानही रोहित पवार यांनी संजय शिरसाटांना दिलं आहे.
संजय शिरसाट यांनी त्यांच्याकडे काय सुरू आहे हे पाहावं. हिंमत असेल तर, माझ्या समोर येऊन वक्तव्य करा, असं आव्हान रोहित पवारांनी दिलंय.
संजय शिरसाट यांना माझ्या मतदार संघाविषयी काय माहिती आहे? त्यांना कर्जत-जामखेडबाबात बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुम्हाला मंत्रिपद मिळणार आहे की नाही, कधी मिळेल, यासाठी पाठपुरावा करा, नको त्या गोष्टींमध्ये उगीच लक्ष घालू नका, असं रोहित पवार म्हणालेत.
कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू व्हावी. यातून तरूणांना रोजगार मिळेल, असं म्हणत रोहित पवार यांनी आज विधिमंडळ परिसरात उपोषण केलं. त्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली. रोहित पवार ही सगळी नाटकं करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षे एमायडीसी नको होती का?, असा सवाल शिरसाट यांनी विचारला. त्याला रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
कर्जत जामखेडमधील युवकांचा रोजगार आणि स्थानिकांचे प्रश्न यासंदर्भात उपोषण केलं आहे. कर्जत जामखेडमध्ये MIDC येणार आहे. मात्र आता तो प्रकल्प रोखण्यात आला आहे. पण आता MIDC ला मंजुरी मिळालीच पाहिजे. कर्जत जामखेडच्या तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे, या मागणीसाठी रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण केलं. मात्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी जात यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ, तुम्ही उपोषण मागे घ्या, असं आवाहन केलं. त्यानंतर रोहित पवार यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये एमआयडीसीला परवानगी मिळाली. पण आता अधिसूचना मिळत नाहीये. माझ्या मतदार संघातील युवकांच्या हक्कासाठी मी लढत आहे. आदरणीय उदय सामंत यांनी शब्द दिला आहे. अधिसूचना अधिवेशन संपण्याच्या अगोदर निघणार आहे. राज्याचे मंत्री म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे . मी माझे उपोषण मागे घेतलं आहे. उद्याची बैठक महत्वाची बैठक होईल. तोडगा निघाला नाही तर असंख्य युवा मुंबईत आंदोलन करतील, असं रोहित पवार म्हणाले.