“चीनने बळकावलेली 26 गस्ती ठिकाणे परत कशी घेणार? पंतप्रधान अमेरिकेतून सांगतील काय?”
Saamana Editorial on PM Narednra Modi : सीमेवरील लपवाछपवी!; सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखात चीनच्या सीमेवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. कावेबाज चीन दररोज हिंदुस्थानची घेराबंदी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच लडाखमध्ये चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषेवर हिंदुस्थानच्या 65 पैकी 26 गस्ती ठिकाणांवर कब्जा केल्याची माहिती समोर आली आहे. तळपायाची आग मस्तकात जावी, अशी ही बातमी असताना केंद्रीय सरकार मात्र सीमेवरील घुसखोरीबाबत लपवाछपवी करण्यात रमले आहे. जणू काही घडलेच नाही, अशा थाटात पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सीमेवरील चीनने बळकावलेली 26 गस्ती ठिकाणे परत कशी घेणार, हे पंतप्रधान अमेरिकेतून तरी सांगतील काय?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
सत्य आणि वास्तविक परिस्थिती यापासून पळ काढणे आणि सतत काही ना काही लपवत राहणे, हा विद्यमान केंद्रीय सरकारचा स्थायीभावच बनला आहे. देशातील जनतेला तर सोडाच, पण सरकारमधील सहकाऱ्यांपर्यंतही बऱ्याच गोष्टी पोहोचू दिल्या जात नाहीत. निवडक दोन डोकी वगळली तर सरकारमधील मंत्र्यांनाही अनेक विषयांची कानोकान खबर नसते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि संरक्षणासारख्या संवेदनशील विषयाबाबत देशाला अनभिज्ञ ठेवणे, ही देशवासीयांशी केलेली प्रतारणाच आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.
काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी हा सारा गंभीर प्रकार उघडकीस आणतानाच लडाखमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीचे वास्तव केंद्र सरकार देशातील जनतेपासून लपवून ठेवत असल्याचा आरोप केला आहे. लेह-लडाखमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने प्रत्यक्ष ताबा रेषेवरील गस्त घालण्याची ठिकाणे किती मोठय़ा प्रमाणावर हिंदुस्थानच्या हातातून निसटली याची वस्तुनिष्ठ माहिती लिखित स्वरूपात केंद्र सरकारला कळवल्यानंतर दिल्लीश्वरांनी खरे तर खडबडून जागे व्हायला हवे होते. संरक्षणमंत्र्यांच्या अधिपत्याखाली किमान एखादी बैठक होऊन सीमेवरील या गंभीर स्थितीविषयी आढावा घेऊन देशवासीयांसमोर वस्तुस्थिती मांडणे आवश्यक होते, असं म्हणत सामनातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.
लडाखमध्ये चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषेवर हिंदुस्थानच्या 65 पैकी 26 गस्ती ठिकाणांवर कब्जा केल्याची माहिती समोर आली आहे. तळपायाची आग मस्तकात जावी, अशी ही बातमी असताना केंद्रीय सरकार मात्र सीमेवरील घुसखोरीबाबत लपवाछपवी करण्यात रमले आहे. बदनामीचे शिंतोडे टाळण्यासाठी सीमेवरील सत्य देशापासून लपवले जात आहे. जणू काही घडलेच नाही, अशा थाटात पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.