काल शिंदेंच्या बाजूने निकाल लागल्यानंतर आजच्या ‘सामना अग्रलेखा’ची हेडलाईन काय?
Saamana Editorial on Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar Judgement : आमदार अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने ... उद्धव ठाकरे यांना धक्का मोठा धक्का.... काल संध्याकाळी संजय राऊत यांनी कडक शब्दात निकालाचा निषेध नोंदवला. त्यानंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखात काय? वाचा...
मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा काल निकाल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल या निकालाचं वाचन केलं. एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असणारा गटच खरा शिवसेना पक्ष आहे, असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरवले. त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता होती ती आजच्या सामना पेपरच्या हेडलाईनची… आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांवर टीकेचा मारा करणारे संजय राऊत आजच्या सामनाच्या अग्रलेखाची हेडलाईन काय देतात आणि अग्रलेखात काय लिहितात. याकडे सगळ्याचं लक्ष होतं. आजचा सामनचा अंक प्रसिद्ध झाला आहे. ‘अखेर चोर मंडळास मान्यता’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना, कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. विधानसभा अध्यक्षांनी सकाळीच सांगितले होते, ‘बेंचमार्क’ निर्णय देऊ. प्रत्यक्षात लोकशाहीचे तोंड जगात काळे करणारा निर्णय त्यांनी दिला आहे. इतिहास घडवण्याची संधी त्यांनी गमावली. शिवसेनेचे बेइमान आमदार आधी सुरतला गेले, तेथून गुवाहटी. नंतर गोवा व शेवटी मुंबईत परतले. हे पक्षविरोधी कारवाईचे टोकच आहे. विधिमंडळात त्यांनी पक्षाचा आदेश मोडला.
‘आपल्यामागे दिल्लीची महाशक्ती आहे. चिंता नको’, असे शिंदे वारंवार फुटीर आमदारांना सांगत राहिले, पण राहुल नार्वेकर घटनेच्या पदावर बसून असत्य सांगतात की, या सगळय़ाशी भाजपचा संबंध नाही. महाराष्ट्रातील चोर मंडळास मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली केली. ज्यांनी हे केले त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही!
महाराष्ट्रातील गद्दारांसंदर्भात निकाल ठरलेलाच होता. तसाच तो आला. धक्का बसावा असे त्यात काहीच नाही. विधानसभा अध्यक्षांनी वाचून दाखवलेले प्रदीर्घ निकालपत्र हे त्यांच्या दिल्लीतील मालकांनी लिहून दिलेले निकालपत्र आहे. एखाद्या विधिमंडळ पक्षात दोन गट पडले म्हणून त्या आधारावर त्या पक्षाची मालकी कोणाकडे हे ठरत नाही, पण भारताच्या निवडणूक आयोगाने त्याच आधारावर शिवसेनेची मालकी फुटीर गटाकडे सोपवली व आता त्याच चुकीच्या निकालावर विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले.