Lalit Patil Case : ललित पाटील केवळ मोहरा, देवेंद्र फडणवीस…; संजय राऊत यांचे गंभीर आरोप
Sanjay Raut on Lalit Patil Case and Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं डोकं ठिकाणावर आहे का?; संजय राऊतांचा थेट सवाल. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी या सगळ्या प्रकरणावरून घणाघात केला आहे.
मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : ड्रग्जमाफिया ललित पाटील याला अटक झाली आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केलेत. मुंबई आणि पुण्यात आतापर्यंत 700 ते 800 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त झालं आहे. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं. ललित पाटील हा केवळ एक मोहरा आहे. या ललित पाटील प्रकरणाचा गैरवापर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणासाठी करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.
राज्यात सध्या ड्रग्जचा बाजार सुरु आहे. यावर गृहमंत्र्यांनी बोलावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं टाळ चिपळ्या का वाजवत बसला आहात? पोलिसांच्या ताब्यात असणारा ड्रग्जमाफिया सांगतो की मला पळवून नेण्यात आलं. येरवड्यातून त्याला बाहेर काढलं. ससून रुग्णालयात 9 महिने त्याला ठेवण्यात आलं. सरकारी पाहुण्यासारखं त्याची खातिरदारी करण्यात आली. मंत्र्यांच्या आदेशाने त्याला पळवून नेण्यात आलं. त्याची व्यवस्था करण्यात आली. हे तो माफिया स्वत: सांगतोय. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं डोकं ठिकाणावर आहे का? की त्यांनाही नैराश्यानं ग्रासलं आहे, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
देवेंद्र फडणवीसजी, आपण राज्याचे गृहमंत्री आहात. आपल्या पदाला, प्रतिष्ठेला शोभेल, असं वागा. अशी आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. नाशिक आणि आजूबाजूचा परिसर हा ड्रग्जच्या विळख्यात सापडला आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब करण्याचा कट आहे. मात्र तसं आम्ही होई देणार नाही. या सगळ्या विरोधात उद्या नाशिकमध्ये आम्ही इशारा मोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चात शाळकरी विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या सगळ्याची चौकशी ही झालीच पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे सरकारमधील दोन मंत्र्यांवर आरोप केले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची चौकशी करावी. त्यासाठी एखादा चौकशी आयोग नेमावा. हिंमत असेल तर या दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.