पलटूरामांपुढे अयोध्येचा रामही…; नीतीश कुमार यांच्या NDA सोबत जाण्याच्या निर्णयावर राऊतांचा शाब्दिक हल्ला
Sanjay Raut on Nitish Kumar And NDA Government in Bihar : पंतप्रधान नरेंद्र मोदी त नीतीश कुमार... ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नीतीश कुमार यांच्या एनडीए सोबत जाण्याच्या निर्णयावर राऊतांनी घणाघात केला आहे. आजच्या सामना अग्रलेखात काय? वाचा...
मुंबई | 29 जानेवारी 2024 : नीतीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत पुन्हा एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर नीतीश कुमार यांनी काल बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुन्हा संध्याकाळी एनडीए सरकारसोबतच सत्तास्थापन केली. नवव्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. मागचे कित्येक दिवस ते इंडिया आघाडीसोबत होते. मात्र इंडिया आघाडीतून बाहेर पडत त्यांनी पुन्हा भाजपशी हात मिळवणी केली. पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन केलं. अन् ते मुख्यमंत्री झाले. या सगळ्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. अयोध्येत श्रीराम, बिहारात ‘पलटू’राम! या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
नितीश कुमार यांनी पलटी का मारली हा संशोधनाचा विषय आहे. देशावरच पलटूरामांचे राज्य आले आहे. अयोध्येत राम व देशात पलटूराम! अजित पवारांचा 70 हजार कोटींचा घोटाळा स्वतः पंतप्रधान मोदी बाहेर काढतात व नंतर अवघ्या दोन दिवसांत त्याच अजित पवारांना भाजपसोबत घेऊन उपमुख्यमंत्री करतात. नितीश कुमारांचेही तेच. पंतप्रधानच पलटूराम बनले तेथे अयोध्येचा राम तरी काय करणार? पलटूरामांपुढे अयोध्येचा रामही हतबलच झाला आहे.
देशात ‘जय श्रीराम’चे नारे दिले जात आहेत. मात्र बिहारात ‘जय श्री ‘पलटूराम’चा नारा ऐकू येत आहे. हे पलटूराम ‘इंडिया’ आघाडीचे कर्तेधर्ते असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. मात्र नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारली असून त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा संसार थाटला आहे. लालू यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर काडीमोड घेऊन या वयात पुन्हा भाजपशी संसार थाटणे हा नितीश कुमारांच्या राजकीय जीवनाचा शेवट आहे. नीतिमत्ता व सिद्धांताच्या राजकारणाची बोली लावणाऱ्यांनीच नीतिमत्तेची ऐशी की तैशी केल्यावर भारतीय जनता पक्षाला तरी का दोष द्यायचा?
भाजपवाले म्हणजे बाजारातले सध्याचे सगळ्यात मोठे खरेदीदार आहेत. विकणारे माल विकायला तयार असल्यावर खरेदीदार व ठेकेदार बोली लावणारच. महाराष्ट्रातला माल प्रत्येकी पन्नास-पन्नास खोक्यांना विकला गेला. बिहारच्या मालाचा काय भाव लावलाय ते देशाच्या जनतेला समजायला हवे. नितीश कुमार यांच्याकडे देशाच्या राजकारणातली एक केस स्टडी म्हणून पाहायला हवे. एक माणूस राजकारणात अल्प काळात किती वेळा रंग बदलू शकतो, हा संशोधनाचा विषय आहे. हरयाणात आयाराम-गयाराम तसे बिहारात हे ‘पलटूराम’ असेच म्हणावे लागेल.
जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आणि हुकूमशाहीविरोधी आंदोलनातून सुरू झालेला नितीश कुमारांचा प्रवास मोदी-शहांच्या हुकूमशाहीपुढे लोटांगण घातल्याने मसणातच संपला आहे व त्याबद्दल त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीस श्रद्धांजली अर्पण करून जनतेने पुढे जायला हवे.
नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे ठरवले आहे. हे त्यांचे वय तसे निवृत्तीचे व वानप्रस्थ आश्रमात जाण्याचे, पण तिकडे अयोध्येत श्रीरामांचे आगमन होताच नितीशबाबू मात्र भाजपच्या वनवासी आश्रमात निघाले आहेत. काही महिन्यांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली, कारण भाजप हा अत्यंत धोकादायक व घातकी पक्ष होता.