रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; पवारांचा मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला
Sharad Pawar PC : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
मुंबई | 09 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जोवर दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत हे होत राहणार आहे. ठाकरे गटाचे नेते यांच्या घरावर केल्या गेल्या ईडीच्या छाप्याबाबत मला अधिक माहिती नाही. पण त्यांच्यावरचा हल्ला असेल. याआधी रोहित पवार यांची केलेली चौकशी असेल. ज्यांच्या हातात सध्या केंद्रात सत्ता आहे. ती त्यांच्या हातात राहील तोवर हे होत राहणार आहे, असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला.
तपास यंत्रणांच्या कारवाईवर पवारांची प्रतिक्रिया
आज मुंबईत शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या चौकशीवर शरद पवार यांनी भाष्य केलं. केंद्रातील सरकार बदलत नाही, तोवर असे हल्ले होत राहणार, असं शरद पवार म्हणालेत.
महाविकास आघाडीच्या बैठकीवर पवार म्हणाले…
आज राजधानी दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक होत आहे. यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. आज दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होत आहे. ही प्राथमिक बैठक आहे. आगामी निवडणुकी एकत्र काम कसं करावं, याची या बैठकीत चर्चा होईल. राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यांना आम्ही सल्ला दिला आहे की, पक्षाच्या वतीन तिथं आपली भूमिका मांडावी. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित आघाडी आणि डावे पक्ष यांना चर्चेत सहभागी करून घ्यावं, असं शरद पवार म्हणालेत.
आज प्राथमिक बैठक होत आहे. नंतर अंतिम बैठक होईल. तेव्हा तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील. तेव्हा जागा वाटपाचा मुद्दा निकाली निघेल. आज प्राथमिक बैठक होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
बिल्किस बानो प्रकरणावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. ते महाराष्ट्र सरकार करेन, असं वाटतं, असं शरद पवार म्हणाले.