शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरेंच्या शिलेदाराचा जय महाराष्ट्र!; शिशिर शिंदे यांचा राजीनामा
Shishir Shinde Resign From Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : शिशिर शिंदे यांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी; कारण काय? वाचा सविस्तर...
मुंबई : उद्या 19 जून, शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन. पण या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ठाकरे गटाचं उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होतं. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसं पत्र शिशिर शिंदे यांनी ठाकरेंना लिहिलं आहे.
मातोश्रीवर जात शिशिर शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय. पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा देतानाच शिशिर शिंदे यांनी पत्र लिहिलं आहे. त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं आहे. या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका मांडली आहे.
राजीनाम्याचं कारण काय?
पक्षात काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. पक्षात घुसमट होत असल्याचं शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
कोण आहेत शिशिर शिंदे?
19 जून 2018 ला शिशिर शिंदे यांची शिवसेनेत घरवापसी झाली होती. घरवापसीनंतर तब्बल 4 वर्ष पक्षात राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे यांची पक्षाच्या उपनेते पदी वर्णी लागली होती.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात सुरू झालेल्या घडामोडींमध्ये शिशिर शिंदे यांना उपनेते करण्यात आलं.
आधी शिवसेना मग मनसे अन् पुन्हा शिवसेना असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास राहिला. त्यांनी 2018 ला मनसेला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेत असताना शिशिर शिंदे हे पक्षाचे नेते होते.
2009 ला भांडुप विधानमतदार संघातून आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिशिर शिंदे यांनी राज ठाकरे यांची साथ दिली होती.
शिशिर शिंदे यांचं पत्र जशास तसं…
सन्माननीय श्री. उध्दवजी ठाकरे,
पक्षप्रमुख, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे),
मातोश्री,
बांद्रे (पूर्व)
सप्रेम जय महाराष्ट्र !
दि. १९ जून २०१८ रोजी मी अतिशय आत्मीयतेने शिवसेनेत पक्षप्रवेश केला त्यानंतर ४ वर्षांत ३० जून २०२२ पर्यंत मला कोणतीही जबाबदारी मिळाली नाही.
प्रत्येक कार्यकर्त्याची काही ओळख असते. कार्यकत्याच काही गुण असतात. परंतु या चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते. माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे “फुकट” गेली अशी माझी धारणा आहे. ३० जून २०२२ रोजी माझी “शिवसेना उपनेते” म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले. असो.
मी आजपासून शिवसेनेच्या उपनेतेपदाचा व पक्षाचा राजीनामा देत आहे. माझ्या कोणत्याही कृत्यामुळे शिवसेनेची बदनामी किंवा अप्रतिष्ठा झाली नाही हे मात्र मी निश्चयपूर्वक अभिमानाने
नमूद करतो.
गेल्या सहा महिन्यांत आपली भेट होणे देखील अशक्य झाले. आपण कोणाला नकोसे होणे माझ्या
संवेदनशील मनाला मुळीच रुचत नाही. माझी घुसमट मीच थांबवतो. या पत्राद्वारे कोणतेही जाहीर दोषारोप न करता मी आपणास ‘जय महाराष्ट्र’ करतो.
धन्यवाद. जय हिंद ! जय महाराष्ट्र !
आपला नम्र,
शिशिर शिंदे