ठामपणे सांगतो, होय… आम्ही परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोय; ‘INDIA’ च्या एकजुटीवर उद्धव ठाकरे यांचं भाष्य
Uddhav Thackeray on INDIA : आधी मी म्हणालो, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ पण आता म्हणतो...; उद्धव ठाकरे यांचा नवा नारा
मुंबई | 27 जुलै 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची’आवाज कुणाचा’ या मुलाखत सत्रातून त्यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य केलं आहे. INDIA याआघाडीवर विरोधक कायमच कुटुंब केंद्रीत आघाडी असल्याची टीका करतात. त्याला या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. मी ठामपणे सांगतो, होय… आम्ही परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोय, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
विरोधक असं म्हणताहेत ना की, परिवार वाचवणारे सगळे विरोधक तिकडे एकत्र आले आहेत. मग तुम्ही सत्ता वाचवायला एकत्र आलात का? जसं बंगळुरूला परिवार वाचवण्यासाठी ही लोकं एकत्र आली असं त्यांचं म्हणणं आहे. मी ठामपणे म्हणतो, होय… परिवार वाचवण्यासाठी एकत्र आलोत. माझा देश माझा परिवार आहे. हेच माझं हिंदुत्व आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना मी कोविड काळात राबवली होती. तीच आज देशभरात राबवण्याची वेळ आली आहे, की ‘माझा देश माझी जबाबदारी’ आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
मी शिवसेनाप्रमुखांच्या मार्गाने चालणारा व्यक्ती आहे. त्यामुळे आमने-सामने करणारा मी आहे. जशास तसं उत्तर देणारा मी आहे. ‘अरे’ ला ‘कारे’ करणारा आहे. त्यामुळे मी लढतोय…, असं ठाकरे म्हणाले.
भाजप पाडत असलेला पायंडा हा देशाला घातक ठरणारा आहे. तो पायंडा म्हणजे तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझंच बनणार! असं जर का चालू राहिलं तर कठीण आहे. ज्या पद्धतीने आता हे महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालंय, ते कसं झालंय हे गावागावातलं अगदी साधं पोरसुद्धा सांगेल की कसे हे जन्माला आले आहेत. अशा पद्धतीने उद्या कोणीही… म्हणजे खोके सरकार म्हणतात त्याला… उद्या खोके घेऊन येतील, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भाजपमध्येसुद्धा राम आता राहिलेला नाहीये. आहेत ते फक्त आयाराम आहेत. भाजपचा राम कधीच गेलेला आहे. आहेत ते फक्त आयाराम, बाकी गयाराम. हा सगळा आयारामांचा पक्ष आहे. तर आयारामांना तुम्ही सामावून घेताना मुळात तुमच्या पक्षातला जो राम होता, त्याला आता तुम्ही फक्त कामापुरता वापरणार का? की त्याला पण तुम्ही संधी देणार आहात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.