भाजपसोबत जाण्याचं कारण काय?; अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे सांगितलं…
Why Ajit Pawar Gone With BJP : भाजपसोबत हातमिळवणी करण्याचं कारण काय?; अजित पवार यांनी सविस्तर सांगितलं...
मुंबई : राष्ट्र्वादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी काही नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपसोबत जाण्याचं कारणही अजित पवार यांनी सांगितलं आहे. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत जायला काय अडचण आहे?, असं अजित पवार म्हणालेत.
विरोधी पक्षांची बैठक होते. त्यामधून आऊटपूट काही निघत नाही. भारत देशाची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. याचा विचार करता आम्ही सगळ्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. आज शिंदे-फडणवीस सरकारचं काम करत आहे. मी इतके दिवस विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. मात्र शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. मागे देखील राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी माझी भूमिका स्पष्ट केली होती, असं अजित पवार म्हणालेत.
काहीजण आता वेगवेगळ्या टीका टीप्पणी करणार… या टीका-टिप्पणीला फार उत्तर देण्याचं कारण नाही. आपण कामाशी मतलब ठेवत असतो. महाराष्ट्र राज्याचा सर्वांगिण विकास करणं, मोठ्या प्रमाणात केंद्रातून महाराष्ट्राला निधी कसा मिळेल ते पाहणं आणि महाराष्ट्रातील जनता समाधानी कशी राहील. सर्व घटकांना कशाप्रकारे मदत करता येईल यासाठी निर्णय घेतला. हा निर्णय आमच्या जवळपास बहुतेक आमदार, लोकप्रतिनिधी, नेते आणि आमदारांना मान्य आहे.
संपूर्ण पक्ष आमच्यासोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. तसंच यापुढे कोणत्याही निवडणुका असतील जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महापालिका, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी यात राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि नावाखाली आम्ही सगळे निवडणुका लढवणार आहोत. त्यातून पक्ष वाढवण्याचा आणि बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याकरता आम्ही आज मंत्रिमंडळात समाविष्ट झालो आहोत, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचं कारण सांगितलं आहे.