“आम्ही आमदार-खासदार नाही, पण इतिहासात नोंद होईल, युद्धाच्या काळात आम्ही पवारसाहेबांसोबत होतो”
Sakshana Salgar on Sharad Pawar : शरद पवार महाराष्ट्राचा प्राण, आम्ही त्यांच्या बाजून लढतोय; वाय बी चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटले
मुंबई : अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. काहींनी शरद पवार यांच्याच सोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे. पण या सगळ्यात राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता मात्र संभ्रमात आहे. शरद पवार यांच्यासोबत असणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाय बी चव्हाण सेंटर बाहेर जमले आहे.
वाय बी चव्हाण सेंटर बाहेर जमलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांच्या बाजूने घोषणाबाजी करत आहेत. शरद पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है, देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो, अशा घोषणा वाय बी चव्हाण सेंटरबाहेर दिल्या जात आहेत.
राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी वाय बी चव्हाण इथं बोलताना शरद पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
महाराष्ट्राचा राजकीय सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय प्राण शरद पवार आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हे सगळे सत्तेसाठी शरद पवारांना सोडून गेलेले आहेत. अशा परिस्थितीतही आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्हाला अभिमान आहे की आमच्या युवती, महिला साहेबांच्या बाजूने आहेत, असं त्या म्हणाल्या.
आमच्याकडं ना कुठली आमदारकी आहे. ना ही कुठली खासदारकी… कुठल्याही पदासाठी आम्ही इथं आलेलो नाही. तर पवारसाहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. ही तत्वांची लढाई आहे. या लढाईत आम्ही पवारसाहेबांसोबतच आहोत, असा विश्वासही सक्षणा सलगर यांनी व्यक्त केला.
महिला भगिनी तरूणी या ठिकाणी आल्या आहेत. शरद पवार यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी इथं आल्या आहेत. इतकंच सांगते की बचेंगे तो और भी लढेंगे, असंही सक्षणा म्हणाल्या.
राष्ट्रवादीचे युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख देखील वाय बी चव्हाण सेंटर इथं दाखल झाले आहेत. आम्ही शरद पवारसाहेबांसोबत आहोत. ही विचारांची आणि तत्वांची लढाई आहे, असं ते म्हणाले.
अजित पवार गटाची बैठक होतेय. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे. तर मग त्यांनी या आमदारांचा फोटो दाखवावा, सिद्ध करून दाखवावं की त्यांना आमदारांचा पाठिंबा आहे, असं मेहबूब शेख म्हणाले.