उद्धव ठाकरेंना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा: देवेंद्र फडणवीस
तुम्ही मला 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला बोलावलंत तरी मी येईन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. | Devendra Fadnavis
नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आशावादी आहेत, याचा मला आनंद आहे. त्यांना 50 वर्षे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray statment about remain CM for next 50 years)
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत उद्योजकांशी संवाद साधला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक मिश्कील टिप्पणी केली होती. अनेक उद्योजक मला उद्घाटनासाठी निमंत्रण देत असतात. त्यांना मी इतकेच सांगतो की, तुम्ही मला 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला बोलावलंत तरी मी येईन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूरात प्रसारमाध्यांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री आशावादी आहे याचा आनंद आहे. त्यांना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच संजय राऊत यांच्यावर मी एक शब्दही बोलणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
‘जैतापूरविषयी शिवसेनेची भूमिका बदलल्यामुळे आनंद वाटतो’
जैतापूरमध्ये मोबदला मिळाल्याने प्रकल्प होऊ शकतो, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यांच्या भूमिकेत झालेला हा बदल पाहून आनंद वाटतो. मात्र, हा मोबदला कोणाला मिळाला, हे पाहावे लागेल, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
नाणारसंदर्भातही शिवसेनेने अशीच भूमिका घ्यावी. तेथील लोकांनी या प्रकल्पासाठी जमीनही दिलेली आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
‘चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी’
महाराष्ट्रात गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यातील काही प्रकल्प हे आमच्या काळातील आहेत. चीनमधील गुंतवणूक आता भारतात येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक महाराष्ट्रातही यायला पाहिजे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
परदेशी गुंतवणुकीत जरात पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. आधी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होत होती. महाराष्ट्र या गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. आता तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
उलटी गंगा वाहण्यास सुरुवात, नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन: उद्धव ठाकरे