अजित पवार आणि उदय सामंत एकत्र, ‘फोटो बघून एकनाथराव…’ चर्चा तर होणारच!
अजित पवार आणि उदय सामंत यांनी एकत्रित फोटो काढल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.
नागपूरः विधानभवन परिसरात आज एका प्रसंगाची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या फोटोची. विशेष म्हणजे अजित पवार यांनी उदय सामंत यांना या फोटोसाठी स्वतः बोलावून घेतलं. फोटोसाठी दोघांनी मस्त पोझ दिली. यावेळी अजित पवार आणि उदय सामंत यांनी दबक्या आवाजात काही संवाद केला. या प्रसंगाचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. सकाळी कामकाज सुरु होण्यापूर्वी सर्व आमदार विधानभवन परिसरात जमा झाले होते. यावेळी अजित पवार यांनी उदय सामंत यांना बोलावून हा फोटो काढला…
फोटो पाहून एकनाथराव…
अजित पवार आणि उदय सामंत यांनी एकत्रित फोटो काढल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. व्हिडिओत अजित पवार पोझ देताना उदय सामंत यांना मिश्किलपणे बोलतायत. हा फोटो पाहून एकनाथराव…. असं म्हणत अजित पवार आणि उदय सामंत दोघेही हसतात… हा फोटो व्हायरल होणार म्हटल्यावर दोघंही आणखी हसतात आणि तिथून पुढे मार्गस्थ होतात..
सत्ताधारी आणि विरोधक हे नेहमी एकमेकांवर जहरी टीका करत असले तरीही राजकारणाबाहेर त्यांच्यातील निकोप मैत्री, परस्पर संबंध अनेक प्रसंगांतून दिसून येतात.
विविध सामाजिक व्यासपीठांवर विरोधी पक्षांतील नेते एकत्र दिसून येतात. त्यावर चर्चाही होतात. विधानभवन परिसरातील आजच्या फोटोवरही वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत आहे.
एकिकडे शिंदे-फडणवीस सरकार येणारा फेब्रुवारी महिना पाहू शकणार नाही, असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे विरोधातील पक्षनेत्यांशी सत्ताधाऱ्यांची जवळीक वाढतेय की काय अशी चर्चा सुरु आहे.
त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात भ्रष्टाचाराचा मोठा आरोप करण्यात आला आहे. नागपूर येथील NIT भूखंड विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा ठपका शिंदेंवर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामागे भाजपचंच षडयंत्र असल्याचा दावाही मविआतर्फे करण्यात येतोय.
शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर होण्याची ही चाहूल असल्याचंही म्हटलं जातंय. या पार्श्वभूमीवर अशा फोटोंची अधिक चर्चा होतेय.