Samruddhi Highway : समृद्धी महामार्ग संदर्भातली मोठी बातमी! 2 मे रोजीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला
Nagpur Samruddhi Highway : दोन मे रोजी होणार होणार उद्घाटन आता पुढे ढकलण्यात आलंय.
नागपूर : समृद्धी महामार्गाचं (Nagpur Samruddhi Highway) उद्घाटन दोन मे रोजी होणार होतं. पहिल्या टप्प्यांचं उद्घाटनं दोन मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते केलं जाणार होतं. मात्र उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला. दोन मे रोजी होणार होणार उद्घाटन आता पुढे ढकलण्यात आलं. त्यामुळे आता 2 मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार नाही. कोणत्या कारणामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं असून आता समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केव्हा होणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. नागपूर- मुंबई 710 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. नागपूर-वाशिम (Nagpur-Washim) 210 किलोमीटरचा पहिला टप्पा दोन तारखेला सुरु होणार होता. पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम जिल्ह्यातील महामार्गाची सुरुवात होणार होती. मात्र आता या पहिल्या टप्प्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
निवेदनात नेमकं काय म्हटलंय
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी निवेदन दिलंय. या निवेदनानुसार, हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पंधराव्या किलोमीटरमध्ये वन्यजीव उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या उन्नत मार्गाचे सुपर स्ट्रक्चर हे आर्च पद्धतीचे आहे. हे काम तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. हे काम अंतिम टप्प्यात असताना त्यातील 105 पैकी काही आर्च स्ट्रीप्सला अपघाताने हानी पोहचली आहे. तज्ज्ञासोबत पाहणी आणि चर्चा करण्यात आली. नवीन पद्धतीनं सुपर स्ट्रॅक्चर बनविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हे काम दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल. वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण करता येणार नाही. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते सेलुबाजारदरम्यान पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढं ढकलण्यात आलं आहे, असं या निवेदनात म्हटलंय.
समृद्ध करणारं समृद्धी महामार्गाचं वैशिष्ट
- मुंबई-नागपूर महामार्गावर 26 टोलनाके असणार आहेत.
- या महामार्गावरून 150 किलोमीटर अंतर एका तासात कापले जाऊ शकते.
- 120 प्रतितास अंतर कापण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- पहिला टप्पा नागपूर ते सेलूबाजार वाशिम जिल्हा असा राहणार आहे.
- या महामार्गावर 11 लाखांपेक्षा जास्त झाडं लावली जाणार आहेत.
- हिरवळ आणि पर्यावणाचं संतुलन राखले जाणार आहे.
- नागपूर- मुंबई या मार्गावरुन दूध, भाजीपाला तसेच इतर उत्पादन मुंबईला वेगानं पोहोचावं, यासाठी हा महामार्ग तयार करण्यात आला आहे.
- या महामार्गामुळं मुंबईतील बाजारपेठ विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुली होणाराय.
24 जिल्हे महामार्गाशी जोडले जाणार
नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून जातो. तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या 14 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. असे या महामार्गाशी महाराष्ट्रातील एकूण 24 जिल्हे जोडले जाणार आहेत.