नायर रुग्णालय प्रकरणी आशिष शेलारांकडून दिशाभूल सुरु, महापौर किशोरी पेडणेकरांचा पलटवार
आम्ही गोणतीही गोष्ट लपवत नाही. शेलारांनी आम्हाला शिस्त शिकवू नये. शेलार आणि इतर असे 12 आमदार गैरवर्तन केल्यामुळे निलंबित झाले आहेत, हे त्यांनी विसरू नये. शेलारांनी विधिमंडळात गुंडगिरी केली होती. नायरमधील घटना दुर्दैवी आहे. कुणाचाही गळा दाब अशी भाषा मी केली नाही, असं पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई : नायर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाल्यानं भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) जोरदार हल्ला चढवला आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे एका बाळाचा मृत्यू झाला. त्यावरून प्रशासनाला जाब विचारायला जाणाऱ्या भाजपच्या नगरसेविकांशी असभ्य भाषेत बोललं जातं. त्यांना मारण्यासाठी गुंडांना बोलावलं जातं. ही अरेरावी कशासाठी? राज्यात काय गब्बरचं राज्य आहे का? असा सवाल शेलार यांनी केलाय. शेलारांच्या या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आशिष शेलार पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केलाय.
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचं काम भाजप करत आहे. मी आशिष शेलारांच्या आरोपांचं खंडण करते. आम्ही कोणतेही गुंड बोलावले नव्हते. शेलारांनी ज्यांचा उल्लेख केला ते आमचे शिवसैनिक होते. भाजपच्या काही अकार्यक्षम नगरसेवकांनी महिलांना पुढे केलं त्यामुळे हा प्रकार घडला. आम्ही गोणतीही गोष्ट लपवत नाही. शेलारांनी आम्हाला शिस्त शिकवू नये. शेलार आणि इतर असे 12 आमदार गैरवर्तन केल्यामुळे निलंबित झाले आहेत, हे त्यांनी विसरू नये. शेलारांनी विधिमंडळात गुंडगिरी केली होती. नायरमधील घटना दुर्दैवी आहे. कुणाचाही गळा दाब अशी भाषा मी केली नाही, असं पेडणेकर म्हणाल्या.
भाजपच्या नगरसेविकांनी मला सभागृहात धमकी दिली- महापौर
पेडणेकर म्हणाल्या की, ते कृत्यू पाहून कोणताही नागरिक संतप्त झाला असता आणि त्याने जबाबदार असेल्यांचा गळा दाबला असता असं मी म्हणाले. मात्र शेलारांनी त्याचा जाणीवपूर्वक विपर्यास केला. त्याठिकाणी जाऊन या विषयाचं राजकारण केलं. भाजपच्या नगरसेविकांनी मला सभागृहात धमकी दिली. डेस्क फेकून देऊ, तुम्हाला ढकलून देऊ, असं त्या म्हणाल्या. नगरसेविका नेहल शाह, शितल गंभीर यांनी मला धमकी दिली. स्थायी समिती अध्यक्ष यांना मारहाण करण्यासाठी भाजपच्या नगरसेविका धावल्या. नेहल शाह, शितल गंभीर यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.
आशिष शेलारांचा आरोप काय?
आशिष शेलार यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जातात. पण तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर 72 तासांनी रुग्णालयात पोहचल्या. 72 तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल शेलार यांनी केला.
इतर बातम्या :